शहराच्या शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालिंका माता मंदिर परिसरात अवैध व्यवसायावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. धुळे दंगलीच्या पाश्र्वभूमीवर हा प्रकार घडल्याने शहरात वेगवेगळ्या अफवा पसरून एकच धावपळ उडाली. दुकाने पटापट बंद झाली. तथापि, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती त्वरित नियंत्रणात आली.
राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या कालिका माता मंदिराजवळ सोमवारी रात्री जुगारातील पैशांच्या देण्या-घेण्यावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. त्यात दोन्ही गटांकडून लाठय़ा, काठय़ा, तलवार यांसारख्या शस्त्रांचा वापर केला गेला. या प्रकारात तीन जण जखमी झाले. धुळे दंगलीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील तणावात भर पडली. सुभाष चौक, सराफ बाजार, फुले मार्केट परिसरातील दुकाने पटापट बंद झाली. मंगळवारी सायंकाळनंतर या प्रकरणातील दुसऱ्या गटाने असोदा रस्ता परिसरातील एका घरावर सशस्त्र हल्ला करत घरातील साहित्याची तोडफोड केली. हा जमाव जुन्या गावातून लाठय़ा, काठय़ा, हॉकीस्टिक, तलवारीसारखे शस्त्र हाती घेऊन येत असल्याचे दिसल्याने सर्वत्र पुन्हा दंगलीची अफवा पसरली. बाजारपेठेतील व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला. या प्रकारांनी शहरात सलग दोन दिवस तणावपूर्ण वातावरण होते.
या दोन घटनांमुळे शहरातील अवैध व्यवसायांची पुन्हा चर्चा सुरू झाली असून पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहात आहे. जळगाव शहरासह परिसरात क्रीडा, सामाजिक संस्था व सांस्कृतिक मंडळाची नोंदणी करून त्या नावाखाली काही प्रतिष्ठित मंडळी सर्रास जुगाराचे अड्डे चालवीत आहेत. शनीपेठ, शहर, जिल्हा पेठ व औद्योगिक वसाहत तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे अनेक अड्डे सर्रासपणे सुरू असतानाही आणि अशा अड्डय़ांमधील वादाचा फटका शहरातील शांततेस बसण्याची शक्यता लक्षात घेऊनही पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धुळे दंगलीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधीक्षक एस. जयकुमार यांनी अवैध व्यवसायांविरोधात कठोरपणे कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Story img Loader