राज्यातील काही जिल्ह्य़ांत दुष्काळाची गंभीर स्थिती असून जनतेसमोर अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यास सरकार प्रयत्नशील आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करावा, असे आवाहन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले.
पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र अश्वलिंग महादेव मंदिरातील महाशिवरात्री महोत्सवानिमित्त रविवारी पाटील यांनी भेट दिली. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस, पृथ्वीराज साठे, जि.प. सय्यद अब्दुल्ला सय्यद यासीन, मठाधिपती महादेवानंद भारती आदी उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले की, तीर्थक्षेत्र विकासअंतर्गत श्रीक्षेत्र अश्वलिंग महादेव मंदिर तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा देण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील. दुष्काळात अभियान म्हणून जलसंधारणाची कामे करावीत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातील पशुधन जगविण्यास छावणीतील जनावरांच्या चाऱ्यासाठी अधिक निधी किंवा दावणीला निधीची मागणी होत आहे. या दोन्हींबाबत सरकार विचार करीत आहे.
मागणी आलेल्या ठिकाणी किंवा पशूंच्या संख्येनुसार छावण्या सुरू करण्यात येतील. दुष्काळी व टंचाई स्थितीत मजुरांच्या हाताला काम, जनावरांना व माणसांना पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा या गोष्टीला सरकार प्राधान्य देत आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.

Story img Loader