शहरात पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एकीकडे अवैध धंद्यांचे अक्षरश: पेव फुटले असताना याच अवैध धंद्यातून शास्त्रीनगरसारख्या संवेदनशील भागात दोन गटात हाणामारी होऊन दगडफेकीचा प्रकार घडला. यात एका पोलिसासह १५ जण जखमी झाले. दंगलखोरांवर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या प्रकरणी दोन्ही गटांविरूध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
शास्त्रीनगर हा झोपडपट्टीसदृश भाग असून तो नेहमीच जातीयदृष्टय़ा संवेदनशील म्हणून समजला जातो. याच भागातील ताश्कंद चौकात जुगार खेळताना तेथेच राहणारे श्रीकांत कोळेकर व  रवी कोळेकर यांनी, येथेच जुगार का खेळता, असा जाब विचारत जुगार खेळण्यास मज्जाव केला. त्यावरून वाद होऊन दगडफेकीस सुरूवात झाली. यात नितीन कोळेकर (३२), नितीन काळे (१७), मालन माने (४०),नागनाथ सोनवणे (४५), धोंडिबा मस्के (६५),दत्ता मस्के (५०), सलमान शेख (१८), शब्बीर मौला शेख (४७), रेहाना रझाक शेख (६२), चाँद शब्बीर शेख (४६)मुदस्सर बहाव शेख (२४), मोबीन मबिबूब शेख (३५) आदी पंधरा जण जखमी झाले. या दगडफेकीची घटना कळताच पोलिसांनी तेथे सौम्य लाठीमार केला. काही वाहनांचेही नुकसान झाले. मात्र दगडफेकीत पोलीस मुख्यालयातील दंगलविरोधी पथकातील पोलीस शिपाई रोहित रोजगुरू (२४) हे जखमी झाले. या सर्वाना छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शास्त्रीनगर भागास भेट देऊन पाहणी केली. या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Story img Loader