शिवसेनाप्रमुखांचा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला शेवटपर्यंत कडाडून विरोध राहिला आणि विदर्भवाद्यांची त्यांनी नेहमीच जबरदस्त शब्दात खरडपट्टी काढली. विदर्भाच्या प्रश्नांची बाळासाहेबांना जाण होती, शेतक ऱ्यांच्या समस्या अवगत होत्या परंतु, विदर्भाला महाराष्ट्रातून वेगळे करणे मात्र मंजूर नव्हते. त्यामुळे बाळासाहेबांचे शाब्दिक फटकारे आणि विदर्भवादी यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायमचा नोंदला जाणार आहे.
एकसंघ महाराष्ट्राचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या बाळासाहेबांचा महाराष्ट्राचे कुठल्याही प्रकारे विभाजन करण्यास विरोध होता, त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या नेत्यांवर त्यांनी सातत्याने शाब्दिक आसूड ओढले.. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात असलेल्या वसंतराव साठे यांच्या उमेदीच्या काळात स्वतंत्र विदर्भाची मागणी उदयास येऊ लागली असताना इंदिरा गांधींच्या ‘किचन कॅबिनेट’मधील मंत्र्याने विदर्भाचे नेतृत्त्व करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा वसंतराव साठे यांना दिला होता. त्या काळातील विदर्भ संग्राम समितीच्या नेत्यांवरही शिवसेनाप्रमुख जबरदरस्त बरसले होते. केंद्रात आणि महाराष्ट्रात काँग्रेसची स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून सत्ता असताना विदर्भ विकासासाठी काँग्रेसने पावले का उचलली नाहीत? असा सवाल शिवसेनाप्रमुखांनी विचारला होता. १९९४ नंतरच्या काळात शिवसेना आणि विदर्भवादी असा संघर्ष बराच काळ रंगला होता.. सेना-भाजप युतीत या मागणीवरून उद्भवलेले मतभेद चव्हाटय़ावर आले होते.
विदर्भ संग्राम समितीत असलेल्या तत्कालीन काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनाही त्यांनी चांगलेच फैलावर घेतले होते. स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणाऱ्या नेत्यांची मती कुंठित झाली आहे, अशा शब्दात त्यांनी ‘सामना’तील एका अग्रलेखातून साऱ्यांचा समाचार घेताना आता अजमल कसाब, ओसामा बिन लादेन किंवा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीनची मदत घेणार का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला होता. विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांना सेनाप्रमुखांनी त्याकाळी लक्ष्य केले होते. धोटे आणि अन्य नेते स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी विदर्भातील जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका करून त्यांनी विदर्भवाद्यांची चांगलीच नाराजी ओढवून घेतली होती. धोटे यांनी प्रसंगी नक्षलवाद्यांची मदत घेऊ, असे प्रत्युत्तर दिल्यानंतर बाळासाहेब अधिकच संतापले होते.
विदर्भाचे समर्थक असलेले तत्कालीन काँग्रेस खासदार विलास मुत्तेमवार, दत्ता मेघे तसेच रणजित देशमुख, भाजपचे नितीन गडकरी, पांडुरंग फुंडकर आणि तरणेबांड आमदार देवेंद्र फडणवीस यांनाही सेनाप्रमुखांच्या संतापाला सामोरे जावे लागले होते. विदर्भाची मागणी राजकीय नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक भेदभावामुळे समोर आल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या तरुण भाजप नेत्याचा सेनाप्रमुखांनी चांगलाच समाचार घेतला होता. ही टीका करत असताना विदर्भातील भारनियमन, बेरोजगारी, प्रशासकीय दुर्लक्ष आणि नक्षल चळवळीचा वाढता प्रभाव यावरही सेनाप्रमुखांचे बारकाईने लक्ष राहिले.
१९९८ साली रामटेकला शिवसेनाप्रमुखांची ‘न भूतो न भविष्यती’ अशी सभा झाली. त्यावेळी शिवसेनेच्या या ढाण्या वाघाने विदर्भाच्या भूमीवर येऊन विदर्भवाद्यांशी प्रत्यक्ष पंगा घेतला. या सभेतील बाळासाहेबांचे भाषण चांगलेच गाजले. भाजपच्या नेत्यांनी त्या काळात स्वतंत्र विदर्भासाठी एल्गार पुकारलेला होता तर शिवसेना नेत्यांनी कडाक्याच्या विरोधाची भूमिका घेतली होती. त्यामुळे विदर्भाच्या भूमीत येऊन बाळासाहेब काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते.
विदर्भाचा विकास न झाल्यास स्वतंत्र विदर्भ देऊन टाकू, अशी घोषणा करून सेनाप्रमुखांनी खळबळ उडवून दिली होती. याचे विदर्भवादी नेत्यांनी नंतर चांगलेच भांडवल केले होते.
सेना-भाजप युतीची राज्यात सत्ता असताना १९९८ दरम्यान विदर्भ, मराठवाडय़ात कर्जबाजारी शेतक ऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढल्यानंतर शिवसेनाप्रमुख प्रचंड अस्वस्थ होते. विदर्भातील शिवसेना नेत्यांना त्यांनी संपूर्ण समस्येचे मूळ जाणून घेण्यासाठी कामाला भिडवले होते. जवळपास १०० शेतकरी-शेतमजुरांच्या आत्महत्यांनी महाराष्ट्र हादरला होता. हजारो शेतकऱ्यांनी जमिनी विकण्यास काढल्या होत्या. यामुळे बाळासाहेब युती सरकारवर नाराज होते.

Story img Loader