महापालिका निवडणुकीच्या राजकीय कारणातून मिरजेच्या भीमनगर परिसरात रिपाइं व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एका महिलेसह पाच जण जखमी झाले असून मिरज शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिरजेतील म्हैसाळवेस परिसरात असणाऱ्या भीमनगरमध्ये गुरुवारी रात्री दोन गटांत लोखंडी सळई, लाठी याने जोरदार मारामारी झाली. या मारामारीत स्न्ोहल पंडीत, अक्षय पंडीत, अभय कांबळे, महादेव कांबळे व श्रीमती विमल कांबळे हे पाच जण जखमी झाले. जखमींना वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या प्रकरणी अक्षय पंडीत व महादेव कांबळे या दोघांनी परस्पर विरोधी गटांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. अक्षय पंडित यांच्या तक्रारीनुसार त्याच्या बहिणीची छेडछाड सिद्धार्थ चौकामध्ये काढण्यात आली होती. याचा जाब विचारल्याचा राग मनात धरुन मयूर कांबळे, पवन सरवदे, शुभम वाघमारे, संजय कांबळे, पंडित कांबळे, अमोल कांबळे व अन्य तिघांनी घराजवळ येऊन लाठी, दगड, विटांचा वापर करुन मारहाण केली. हे सर्व जण राष्ट्रवादीचे कार्यकत्रे असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे महादेव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अभिजित कांबळे, अशोक कांबळे, संदीप दरबारे, सचिन दरबारे, अक्षय पंडीत, योगेश बनसोडे व अन्य तीन ते चार साथीदारांनी घराजवळ येऊन दगड, विटांचा मारा करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशोक कांबळे याने चाकूने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विमल कांबळे हिने महापालिका निवडणुकीवेळी विरोधी पक्षाचा प्रचार केल्याचा राग मनात धरुन भांडण काढण्यात आले आहे. हे भांडण मिटविले असताना त्याच कारणावरुन पुन्हा हा प्रसंग घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान पोलिसांनी अभिजित कांबळे व संदीप दरबारे या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा