प्रकाश झा यांचे गेल्या काही वर्षांतले चित्रपट म्हणजे भारतीय समाजाचे जळजळीत, धगधगीत वास्तवाचे चित्रण करणारे चित्रपट आहेत. एकसंध पटकथा, कथानकातील नाटय़ टिकवून प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. परंतु ‘सत्याग्रह’ पाहताना हा अनुभव तकलादू, खूपच फिल्मी ठरतो. सिनेमावरची दिग्दर्शकाची पकड ढिली झाल्याचा प्रत्यय येतो. त्यामुळे सगळे कलावंत, त्यांचा अभिनय हे सामथ्र्य ठरूनही सिनेमा परिणामकारक ठरत नाही. अण्णा हजारे यांच्या आंदोलनासारख्या आंदोलनाचे दर्शन घडवूनही प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेण्यात दिग्दर्शक अपयशी ठरतो.
अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील रामलीला मैदानावरील आंदोलनाने सबंध देशाचे लक्ष वेधून घेतले. त्यासारखेच एक आंदोलन चित्रपटात समोर येते. बुजुर्ग शिक्षक द्वारका आनंद भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व्यवस्थेला कंटाळून, चिडून जाऊन अंबिकापूरच्या जिल्हाधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावतात आणि त्याचा परिणाम म्हणून एक जनआंदोलन उभे राहते. व्यवस्थेविरुद्धचा संताप आजघडीला देशातील जनतेच्या मनात ठसठसतो आहे, ‘नाही रे’ वर्गाचा अंसतोष, समाजातील जात व्यवस्थेचे गंभीर परिणाम लोक भोगत आहेत, महागाईचा आगडोंब उसळलाय, राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे महाराष्ट्रात आणि देशात समोर येत आहेत. शासनकर्ते मुर्दाड बनले आहेत, गुंडप्रवृत्ती बळावली आहे, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचाराची परिसीमा, राज्यकर्त्यांची निर्णयशून्यता याचा पदोपदी अनुभव लोकांना येतो आहे. याचेच चित्रण दिग्दर्शकाने केले आहे. ‘सेटिंग’चे राजकारण, समाजकारण याचीही उदाहरणे लोकांसमोर सातत्याने दिसत आहेत, त्याचेही चित्रण दिग्दर्शकाने चित्रपटात केले आहे. परंतु हे सारे अतिशय फिल्मी पद्धतीने केल्याने चित्रपटाच्या परिणामाची धार बोथट झाली आहे. वस्तुत: एक आंदोलन देशात प्रत्यक्षात उभे राहिलेले लोकांनी पाहिले आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून त्या आंदोलनाला कसा भरभरून प्रतिसाद मिळाला, लोकांनी त्यातून प्रेरणा घेऊन छोटय़ा छोटय़ा स्तरावर माहिती अधिकाराच्या माध्यमातून गैरकारभाराची प्रकरणे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशा वेळी असेच एक आंदोलन चित्रपटातून दाखविणे हे समर्पक असले तरी आवश्यक तो परिणाम साधण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे.
द्वारका आनंद ही व्यक्तिरेखा अभिनयसम्राट अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. तत्त्वनिष्ठ, सचोटीपूर्ण व्यक्तिमत्त्व, त्यांच्यासारखाच त्यांचा मुलगा अखिलेश, त्याची पत्नी सुमित्रा या व्यक्तिरेखा आहेत. अजय देवगणने साकारलेली मानव ही व्यक्तिरेखा असो की टीव्ही पत्रकाराच्या भूमिकेतील करिना कपूर असो, अंबिकापूरच्या राजकारणात नेता बनू पाहणारा अर्जुन रामपाल असो प्रत्येक व्यक्तिरेखेच्या बऱ्या-वाईट बाजूंनी भरलेल्या छटा दाखविण्यातही दिग्दर्शक यशस्वी ठरतो. शेवटी सत्याचाच विजय होतो, भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई नायक जिंकतो असा ठोकळेबाज शेवट करण्यासही दिग्दर्शकाने फाटा दिला आहे. परंतु तरीसुद्धा द्वारका आनंद, मानव यांची लढाई प्रेक्षकांचा ठाव घेऊ शकत नाही. हे आपण प्रत्यक्ष पाहिलेल्या आंदोलनाची फिल्मी आवृत्ती आहे असे प्रेक्षकाला वाटत राहते.
कपटी, धूर्त, केवळ पैसे कमावून आपले उखळ पांढरे करण्यासाठीच राजकारणात आलेला बलराम सिंग ही व्यक्तिरेखाही मनोज बाजपेयीने चांगली साकारली आहे. दिग्दर्शकाने गेल्या काही चित्रपटांप्रमाणेच कलावंतांची फळी तीच ठेवल्यानेही प्रेक्षकाची दिग्दर्शकाकडून असलेली नावीन्याची अपेक्षा चित्रपट पूर्ण करू शकत नाही. अभिनय हेच बलस्थान असलेला हा चित्रपट तकलादू पटकथेमुळे अर्थहीन ठरतो. एक आंदोलन उभे राहते, अहिंसेचे आंदोलन समूह मनोवृत्तीमुळे हिंसेचे रूप धारण करते, राजकारणी आपल्या परीने त्याचाही वापर करू पाहतात, न्याय मिळत नाही, त्यासाठी म्होरक्याचा बळी जातो आणि आंदोलन पुढे चालू राहते. हे सगळे काही दाखविताना प्रेक्षकालाही पटते, परंतु अपेक्षित परिणाम मात्र साधत नाही. त्यामुळे प्रेक्षक रिताच राहतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा