कर्नाटकातील भाजपाचे राज्य जाऊन काँग्रेसी शासन आले, तरी सीमाभागातील मराठी भाषकांवरील दडपशाही कायम राहिली आहे. भाजपाच्या शासनाप्रमाणेच बेळगावात विधानसभेचे अधिवेशन घेत काँग्रेसीशासनही अन्यायाची री ओढत असल्याने या विरोधात मराठी भाषकांनी सोमवारी (२५ नोव्हेंबर) बेळगावात महामेळाव्याचे आयोजन केले असून अंतिम लढय़ाला हात घातला आहे. संयुक्त महाराष्ट्र चौकात मराठी भाषकांचा अभिमान म्हणून लावण्यात आलेला ‘संयुक्त महाराष्ट्र’ चौक नावाचा फलक कन्नडिग्गांच्या दबावामुळे काढून टाकण्यास भाग पाडले. याच चौकातील भगव्या ध्वजाकडे त्यांची तिरकी नजर लागली आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या मराठी भाषकांनी हलगा गावातील भगवा ध्वज पुनश्च उभारून कन्नडधार्जिण्या शासनाला सनसणीत चपराक लावून मराठी बाण्याचे दर्शन घडविले आहे.    
सीमाभागातील मराठी भाषकांनी गेली सहा दशके कर्नाटक शासनाच्या कन्नडधार्जिण्या धोरणाविरोधात लढा दिला आहे. अनेकदा कठोर कारवाई करत मराठी अस्मितेचा लढा मोडून काढण्याचे प्रयत्न झाले, तरी तेथील सीमा भाषकांची एकजूट कायम राहिली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार संभाजी पाटील व आमदार अरविंद पाटील यांच्या रूपाने भगव्या ध्वजाचे दोन पाईक कर्नाटक विधिमंडळात पोहचले. त्यांनी कर्नाटक शासनाच्या वतीने मराठी भाषकांवर होत असलेल्या दडपशाहीच्या धोरणाविरुद्ध सभागृहात अनेकदा आवाज उठविला. तथापि सरकारचे कन्नडिग्गांना अभय देण्याचे आणि मराठी भाषकांची मानहानी करण्याचे धोरण कायम राहिले. तेथील भाजपाचे शासन जाऊन काँग्रेसचे शासन आल्यावर काही फरक पडेल, अशी अपेक्षा वाटत होती. पण तिही फोल ठरली आहे. उलट कन्नडिग्गांचा कैवार घेणाऱ्या टोळक्यांना मोकळे सोडायचे आणि सनदशीर मार्गाने लढा देणाऱ्या सीमाभागातील कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला.     
संयुक्त महाराष्ट्र चौकामध्ये संयुक्त महाराष्ट्र या नावाचा फलक व भगवा ध्वज लावण्यात आला आहे. कन्नडिग्गांना या दोन्ही बाबी वर्षांनुवर्षे खुपत होत्या. दबावतंत्राचा वापर करीत संयुक्त महाराष्ट्र नावाचा नामफलक प्रशासनाला काढून टाकायला लावला आणि आता त्यांची विखारी नजर भगव्या ध्वजावर खिळली आहे. वास्तविक कर्नाटक शासन निर्माण होण्यापूर्वी म्हणजे १९५२ साली हा फलक तेथे लावण्यात आला आहे. त्यामुळे फलक काढण्याची कार्यवाही केवळ मराठी द्वेषातून केली असल्याचा आरोप आमदार अरविंद पाटील यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केला. कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दोघा मराठी भाषक आमदारांचा शपथविधी पार पडला. पण तत्पूर्वी बेळगाव महापालिकेची निवडणूक होऊन तेथे भगवा ध्वज फडकविणाऱ्या ३३ मराठी भाषकांना अजूनही शपथ दिलेली नाही. यामागे केवळ मराठी द्वेष हे एकच कारण आहे. या अन्यायाविरुद्ध पाटील आमदार द्वयींनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला असता न्यायालयात दावा सुरू असल्याचे कारण सांगून शासनाने मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. हलगा या गावामध्ये मराठी युवक मंडळाचा मानाने फडकणारा भगवा ध्वज काढायला लावून कर्नाटक शासनाने आपली खदखद व्यक्त केली होती. पण या दडपशाहीला भीक न घालता मराठी भाषक युवकांनी पुन्हा भगवा ध्वज उभारून आपल्या अस्मितेचे दर्शन घडविले.     
कर्नाटक शासनाने बेळगाव येथे गतवर्षी हिवाळी अधिवेशन भरविण्यासाठी ‘विधानसौद’ ची उभारणी केली. त्याच्या उद्घाटन समारंभाला आणि पहिल्या अधिवेशनाला सीमाभागातील मराठी भाषकांनी प्रखर विरोध केला होता. यंदाही असेच अधिवेशन बेळगावमध्ये भरविले जात असून त्याला विरोध दर्शविण्यासाठी मराठी भाषकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सीमाभागाचा लढा अंतिम टप्प्यात पोहोचलेला असताना सीमाभागातील युवा पिढीला लढय़ाबाबत जागृत करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत आहे. त्यासाठी मराठी भाषक नेते व कार्यकर्त्यांनी सीमाभागासह महाराष्ट्रात संपर्क वाढविला आहे. कन्नडधार्जिण्या कर्नाटक शासनाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी मराठी भाषकांनी बेळगावात महामेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यालाही परवानगी मिळू नये, अशा हालचाली कन्नडिग्गांनी सुरू केल्या असल्या, तरी परवानगी मिळो न मिळो महामेळावा घेणारच असा निर्धार आमदार संभाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे.
 मराठी भाषकांची आक्रमक रणनीती   
गतवर्षी बेळगावात विधानसभेचे अधिवेशन घेण्यात आले तेव्हा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जे नियोजन करणे आवश्यक होते त्याला खूपच कमी अवधी मिळाला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना कुठे भेटायचे हा प्रश्न निर्माण झाला. महामेळाव्याच्या दिवशीच मराठी नेते अन्य कार्यक्रमात गुंतले होते. गतवर्षीचा हा गोंधळ लक्षात घेऊन यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारद्वयींसह प्रमुखांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील, उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांच्यासह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली व कोल्हापुरातील महापौरांशी संपर्क साधून महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रत्यक्ष भेटीत केले आहे. या आक्रमक रणनीतीच्या पाश्र्वभूमीवर सोमवारच्या महामेळाव्यात मराठी अस्मितेचा हुंकार अधिक ठळकपणे उमटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Final fight of maharashtra ekikaran samiti with karnataka govt
Show comments