गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर महापालिकेवर वर्चस्व ठेवणा-या व मनमानी कारभार करून शहराची वाट लावणा-या कारभा-यांविरुद्ध आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाईचा हातोडा उचलताच त्यांना पालिकेतून हुसकावून लावण्याचा घाट घालण्याचे छुपे प्रयत्न होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे पाठबळ लाभल्यामुळे गुडेवार यांची बदली होणे शक्य नसल्याचे दिसू लागताच अखेर सत्ताधारी हितसंबंधीयांची आयुक्तांविरोधातील आकसाची भावना बाहेर पडलीच. अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईवरून सत्ताधारी नगरसेवकांनी गुडेवारांशी घातलेला वाद व केलेली दमबाजी हे त्याचेच द्योतक मानले जात आहे.
दरम्यान, एकीकडे आयुक्त गुडेवार यांच्याशी हुज्जत घालून दमबाजीची भाषा करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दोघा नगरसेवकांचा बोलावता धनी कोण, हे केव्हाच स्पष्ट झाले असून या मुद्यावर नागरिकांच्या भावना तीव्र आहेत, तर राजकीय दबावतंत्राचा वापर करून आयुक्त गुडेवार यांच्या बदलीचा घाट घातला असल्याने त्याविरोधात सहनशील तथा सोशिक सोलापूरकरांची संवेदनशीलता जागी होईल काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
काल शनिवारी मरिआई चौकाजवळील डोणगाव रस्त्यावर पुन्हा उभारण्यात आलेल्या टप-यांची अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेचे पथक गेले होते. अतिक्रमणे काढताना तेथील संबंधित मंडळींनी पालिका अधिका-यांशी वाद घातला होता. कारवाईनंतर पथकातील सहायक अभियंता विजय जोशी (५०) यांना भैया चौकात अडवून बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यामागे अर्थात हितसंबंधी नगरसेवकांचा हात असल्यामुळे शारीरिक व मानसिक धक्का बसल्यामुळे जोशी हे हल्लेखोरांविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल करण्यास धजावत होते. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी जोशी यांना स्वत: फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेऊन फिर्याद दाखल करण्यास लावले. तर दुसरीकडे हल्लेखोरांनीही जोशी यांच्यावर दबाव आणण्यासाठी महिलेचा विनयभंग करून दागिन्यांची जबरी चोरी केल्याची परस्पर फिर्याद दिली व पोलिसांनीही ती दाखल करून घेतली. दरम्यान, जोशी यांच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी गणेश राजेश भोसले (३०, रा. जुनी लक्ष्मी-विष्णू मिल चाळ, सोलापूर) व रवींद्र मच्छिंद्र भोसले (३७, रा. साठे-शिंदे वस्ती, डोणगाव रोड) या दोघांना अटक झाली असून त्यांना येत्या १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या हल्ल्यातील अन्य दोघाजणांचा शोध पोलीस घेत आहेत.
चार महिन्यांपूर्वी महापालिकेत दाखल झालेले आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्वच्छ व कार्यक्षम प्रशासनाचा अनुभव देत जनमानसात विश्वासार्हतेची भावना निर्माण केली आहे. शहरातील डिजिटल फलकांवर घातलेला परिणामकारक आळा, बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याची सातत्याने चालविलेली मोहीम, त्याच वेळी महापालिकेत माजलेली भ्रष्टाचाराची व अनागोंदी कारभाराची बजबजपुरी दूर करण्याचा प्रयत्न करताना कोणाचाही न बाळगलेला मुलाहिजा, त्यातून ३०पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचा-यांविरुद्ध केलेली निलंबनाची कारवाई तसेच महापालिकेच्या खडखडाट असलेल्या तिजोरीत एलबीटी व मिळकतकर थकबाकी वसुली मोहिमेचा लावलेला धडाका, अशा माध्यमातून धाडसाने पावले उचलत असताना दुसरीकडे केंद्र सरकारकडून सुमारे दोनशे सिटी बसेस मंजूर करून सकारात्मक प्रशासनाची अनुभूती देण्याचा प्रयत्न आयुक्त गुडेवार यांनी केला आहे.
या पाश्र्वभूमीवर स्वच्छ व पारदर्शक कारभार करताना आयुक्त गुडेवार यांनी पालिकेचे कारभारी असलेले विष्णुपंत कोठे यांच्यासह अन्य राजकीय मंडळींच्या बेकायदा साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी प्रयत्न हाती घेतले. विशेषत: कोठे यांच्या मालकीच्या द्राक्ष मद्यार्क कारखान्याकडून थकीत असलेली सुमारे २९ लाखांच्या एलबीटी वसुलीसाठी कारखान्याला सील केल्याने तसेच मुरारजी पेटेतील सुशील रसिक सभेच्या सभागृहाचे बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यासाठी नोटीस बजावल्यामुळे कोठे गट सध्या ‘बॅकफूट’वर गेल्याचे मानले जात आहे. त्यातून त्यांच्या समर्थकांमध्ये आयुक्त गुडेवार यांच्याविषयीचा आकस वाढीला लागला आहे. त्यातूनच अतिक्रमणे काढून टाकण्याच्या कारवाईचे निमित्त साधून कोठे समर्थक चेतन नरोटे व सध्या पालिकेच्या राजकारणात कोठे यांच्या मर्जीतील समजले जाणारे राष्ट्रवादीचे दिलीप कोल्हे यांनी आयुक्त गुडेवार यांच्या दालनात घुसून त्यांच्याशी असभ्य भाषेत हुज्जत घालत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

Story img Loader