शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्यांचा विनयभंग करणारा वासनापिसाट अय्याज मोहम्मद अली अन्सारी अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला असला तरी पोलीस यंत्रणेतील एक मोठी त्रुटी यानिमित्ताने समोर आली आहे. सुमारे ६० पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत असताना असा आरोपी आपल्या रेकॉर्डवरच आहे, हे त्यांना समजलेच नाही. २०१३ मध्ये अन्सारीला मोबाईल चोरी प्रकरणात अटक झालेली होती आणि तब्बल सहा महिने तो तुरुंगात होता. पोलिसांनी गावभर शोध घेत असताना आपले दप्तर मात्र तपासले नाही किंवा तपासले जरी असले तरी त्यांना तो सापडला नाही.
अय्याज अन्सारीने ७ एप्रिल २०१४ रोजी एका १३ वर्षीय मुलीचा सायन येथे रस्त्यात अडवून विनयभंग केला. ती तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली. हा आरोपी एका डोळ्याने अधू होता आणि थोडा लंगडत होता, असे या मुलीने सांगितले होते. पोलिसांना त्याचे सीसीटीव्हीवरील चित्रण पण सापडले. त्यावेळी त्याच्या नावावर ११ अशाप्रकारचे विनयभंगाचे गुन्हे दाखल होते. पश्चिम उपनगरातील हा वासनापिसाट आता दक्षिण मुंबईत दाखल झाला आहे, असे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिल्यानंतर या वासनापिसाटाचे गांभीर्य समोर आले.
माध्यमात बातम्या आल्यानंतर आणखी एका मुलीने पुढे येऊन तक्रार दिली. अल्पवयीन शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्यांचा विनयभंग करणारा हा वासनापिसाट मुंबईत मोकाट फिरतोय अशा बातम्या माध्यमातून येऊ लागल्यानंतर पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवून विशेष पथक स्थापन केले. सुमारे ६० पोलीस त्याचा तपास करत होते. फिर्यादींच्या वर्णनावरून त्याची तीन रेखाचित्रे बनविण्यात आली. जागोजागी त्याच्या रेखाचित्रांचे पोस्टर लावण्यात आले. गुन्हे शाखेची सर्व युनिट त्याला शोधत होती. अखेर डी. एन. नगर पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली आणि तो जेरबंद झाला.
वास्तविक अय्याज अन्सारी एका डोळ्याने अधू होता. किंचित लंगडत होता. त्याच्या तपासासाठी हा मोठा दुवा होता. आधार कार्डात, निवडणुकीच्या यादीत त्याचा फोटो आहे का ते तपासले जात होते. अशा वर्णनाच्या इसमाची माहिती देणाऱ्या बक्षिसही जाहीर केले गेले होते. अय्याजला जानेवारी २०१३ मध्ये मालाड पोलिसांनी मोबाईल चोरीच्या प्रकरणात अटक केली तेव्हा त्याचा ‘रेकॉर्ड’ (अभिलेख) बनवून ठेवलेला होता. पोलिसांनी जर स्वत:चेच दप्तर तपासले असते तर एवढी उठाठेव करावी लागली नसती. आपल्या खात्यातील रेकॉर्ड का तपासले नाही, याबाबत पोलीस मौन बाळगून आहेत. एखाद्या गुन्ह्य़ातील आरोपीला शोधताना अनेक संशयितांची ‘चौकशी’ केली जाते. अभिलेखावरील आरोपींना पकडले जाते. या प्रकरणात मात्र ही प्रक्रिया पाळण्यात आली नाही. परिणामी ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी पोलिसांची ही गत झाली.
१० जानेवारी रोजी २०१३ अन्सारीला अटक झाली. पण त्याच्या दोन दिवस आधीच, ८ जानेवारीला त्याने जुहू येथे एका मुलीचा विनयभंग केला होता. सहा महिन्यांनी तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा त्याने मुलींचे विनयभंग करण्याचे सत्र सुरू केले. त्याने किमान २५ मुलींचे विनयभंग केल्याची कबुली दिली आहे. पण किमान ५० हून अधिक मुलींना त्याने अशापद्धतीने लक्ष्य केल्याची पोलिसांची शक्यता आहे.
हा आरोपी अशा पद्धतीने मोकाट राहिला कसा याबद्दल खुद्द पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आम्ही हे प्रकरण एक विशेष ‘केस स्टडी’ म्हणून बघतो आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते. पण किमान रेकॉर्ड वरचे गुन्हेगार शोधण्याची पद्धत जरी अत्याधुनिक करून व्यवस्थीत हाताळली गेली तरी बरेच काही साध्य होऊ शकणार आहे.
असा लावला होता सापळा..
२०१२ च्या शेवटी उपनगरात शाळकरी मुलांचे मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. एक इसम शाळकरी मुलांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल लंपास करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यामुळे मालाड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर हरपुडे आणि पोलीस हवालदार राणे यांनी या आरोपीला पकडण्यासाठी एक सापळा लावला होता. त्यांनी एका चहावाल्याच्या मुलाला सोबत घेतले. अन्सारी या सापळ्यात अडकला. या मुलाला मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे आणि त्यांना नंबर द्यायचा आहे, असे सांगून त्याने त्याला एका मॉलजवळ नेले. पोलीस त्याच्या मागावर होते. तो एकांतात पोहोचताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या झडतीत दोन मोबाईल सापडले. ते दोन्ही त्याने अध्र्या तासापूर्वी कॉलेजच्या एका मुलाकडून चोरलेले होते.
काखेत कळसा गावाला वळसा..
शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्यांचा विनयभंग करणारा वासनापिसाट अय्याज मोहम्मद अली अन्सारी अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला असला तरी पोलीस यंत्रणेतील एक मोठी त्रुटी यानिमित्ताने समोर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-04-2014 at 01:45 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finaly serial child molester caught after molesting 25 kids