विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाच्या दोन दिवसांच्या चर्चासत्रात २२ शिक्षकांनी लघुशोध प्रबंध सादर केले. त्यातील उत्कृष्ट ठरलेल्या प्रा. मेनेवार यांना गुलबानुबाई हुद्दा पारितोषिक प्रदान करण्यात आले. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेच्या स्वातंत्र्य सभागृहात आयोजित  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी पंधरा लघु शोध निबंधाचे वाचन केले. डॉ. प्रमोद लाखे या सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. माधुरी लेले या सत्राच्या समन्वयक होत्या. याप्रसंगी आचार्य पदवीप्राप्त अकरा शिक्षक तसेच विशेष कार्य करणाऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांची संगीत रजनी झाली.
‘महाराष्ट्रातील सहकाराची वृद्धी व ऱ्हास’ विषयावर सात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी लघुशोध निबंधांचे वाचन केले. धनंजयराव गाडगीळ सहकार प्रबंधन संस्थेचे माजी संचालक जगदीश किल्लोळ या सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. समन्वयक प्रा. रत्नाकर बोमीडवार होते. ‘महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र’ विषयावर ज्येष्ठ सहकार नेते रवींद्र दुरुगकर यांचे भाषण झाले. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी ‘युरोप खंड व भारत’ विषयावर बोलताना जागतिक मंदी व भारत, युरोपातील ढासळलेली आर्थिक परिस्थिती यावर मार्मिक विवेचन केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अर्थशास्त्र मंडळाचे अध्यक्ष प्रा. बी. बी. इंदोरे यांनी अकरावी व बारावीच्या अर्थशास्त्र अभ्यासक्रमाचे बदलेले स्वरूप विशद केले.
चर्चासत्राचा समारोप वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महापौर अनिल सोले व पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या उपस्थितीत झाला. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे अर्थशास्त्राविषयीचे ज्ञान अद्यावत व्हावे, या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित केले जात असल्याचे मंडळाचे सचिव प्रा. राजाभाऊ दुरुगकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रजनी हुद्दा यांनी केले. प्रा. चेतन हिंगणेकर यांनी आभार मानले. मधुकर बोरकर, विठ्ठल गिरडकर, विजय बालपांडे, विजय मसराम, पी. आर. देशमुख, एम. ए. काळे, जी. बी. धुळधुळे, भरत काळे हे प्राध्यापक तसेत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक कार्तिक नवघरे, विक्की सावरकर, अनिल मोरघडे व अंकित नागुलवार यांनी चर्चासत्रासाठी परिश्रम घेतले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा