शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहने थेट रस्त्यात उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी नेहमीचीच झाली असून नागरिक मात्र त्रस्त झाले. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेविका अंबिका डहाळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन वाहतूक कोंडी दूर करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत शहर वाहतूक शाखेतर्फे धडक मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांकडून दंड वसूल करण्यात आला.
मुख्य बाजारपेठेतील नारायण चाळ ते क्रांती चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, सुभाष रस्ता भागात खरेदीसाठी दिवसा व रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी असते. शहरासह ग्रामीण भागातून मोठय़ा संख्येने लोक खरेदीसाठी येतात. त्यामुळे नेहमीच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. भाजी विक्रेत्यांचे गाडे, ऑटो, दुचाकी तसेच चारचाकी वाहने सर्रास उभी केली जात असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. याचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो. वारंवार तक्रारी करूनही वाहतूक शाखा दखल घेत नसल्याचे पाहून शिवसेना नगरसेविका डहाळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. भाजी विक्रेत्यांना शनिवार बाजारात हलवावे, वाहनांसाठी व्यवस्था करावी अशी मागणी यात करण्यात आली. डहाळे यांच्यासह आशा कोलपेकवार, सुषमा बांठीया, रुपाली शैव, श्यामा चांडक, वैशाली डहाळे, निर्मला डहाळे, दैवशाला शहाणे आदींच्या निवेदनावर सह्य़ा आहेत.
महिलांच्या निवेदनानंतर वाहतूक शाखा हलली!
शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहने थेट रस्त्यात उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी नेहमीचीच झाली असून नागरिक मात्र त्रस्त झाले. त्याची दखल घेत रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांकडून दंड वसूल करण्यात आला.
First published on: 19-06-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fine collection to started in parbhani