पश्चिम रेल्वेने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज मोहीम उघडत तब्बल पाच हजार फुकटय़ांवर कारवाई केली. अंधेरी आणि बोरिवली-विरार या स्थानकांदरम्यान केलेल्या या कारवाईत ११ लाखांपेक्षा जास्त दंड वसुली करण्यात आली.
बोरिवली आणि विरार या स्थानकांदरम्यानच्या स्थानकांवर १५० तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाचे ३० जवान याच्या सहाय्याने ही धडक मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत एकाच दिवसात या मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या ७०० लोकांना ताब्यात घेण्यात आले. यात काही महिलांचाही समावेश होता. त्यासाठी पश्चिम रेल्वेने महिला तिकीट तपासनीस व रेल्वे सुरक्षा कर्मचारी यांची मदत घेतली. या ७०० जणांकडून तब्बल दोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्यानंतर अंधेरी स्थानकात केलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत तर पश्चिम रेल्वेला मोठे घबाड हाती लागले. विनातिकीट, चुकीचे तिकीट आणि अतिरिक्त सामान यांच्यासह प्रवास करून पश्चिम रेल्वेला ठकवणाऱ्या ४२८६ लोकांवर या मोहिमेत कारवाई करण्यात आली. ही एकाच स्थानकात केलेली सर्वात मोठी कारवाई असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रवाशांकडून ९.१७ लाख एवढा प्रचंड दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रवाशांच्या मनात विनातिकीट प्रवास करताना पकडले जाण्याची भीती बसावी, यासाठी अशा मोहिमा आम्ही वारंवार हाती घेणार आहोत. मात्र भीतीपेक्षाही प्रवाशांनी आपली जबाबदारी ओळखणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे रेल्वेचा आणि पर्यायाने प्रवाशांचाच फायदा होणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी स्पष्ट केले.

Story img Loader