बसचालक-वाहकांच्या मनमानी व लहरीपणाच्या तक्रारीच्या सुनावणीत राज्य माहिती आयुक्तांनी एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना फटकारताना या प्रकरणात तक्रारधारक सेवानिवृत्त नायब तहसीलदार एन. आर. स्वामी यांना महामंडळाने एक हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश दिला. या निर्णयामुळे बस प्रवाशांना दिलासा मिळाला, तर महामंडळाला मात्र धक्का बसला आहे.
दि. १२ मार्च २०१० रोजी सकाळी ६ वाजता स्वारगेट (पुणे) येथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या एशियाड बसमधून (एमएच१२ सीएच ७५०२) माहिती अधिकाराचे अभ्यासक तथा सेवानिवृत्त नायब तहसीलदार एन. आर. स्वामी प्रवास करीत होते. ठाणे येथे शेवटच्या स्थानकापर्यंत गाडी जाईल, तथापि लोणावळ्यास गाडी जाणार नाही, म्हणून प्रवाशांना सांगण्यात आले होते. जवळपास ६ ते ८ स्थानकांवरील प्रवाशांना लोणावळ्यास बस थांबणार नाही, म्हणून बसमध्ये घेण्याचे वाहकाने नाकारले. परंतु प्रत्यक्षात लोणावळा स्थानक येताच गाडी लोणावळा स्थानकात थांबविली. वाहक व चालकाने येथे नाश्तापाणी करून गाडी ठाण्याकडे मार्गस्थ केली. गाडीतील जागरूक प्रवासी स्वामींनी वाहकाला लोणावळ्याचे प्रवासी नाकारून गाडी लोणावळ्यास कशी काय आणलीत, याबद्दल विचारणा केली असता थातूरमातूर उत्तरे दिली गेली. तसेच ही विचारणा केल्याचा राग मनात धरून गाडी ठाण्यास वंदना टॉकीजपर्यंत न नेता रेल्वे स्टेशनजवळच सर्व प्रवाशांना खाली उतरवत गाडी पुढे जाणार नाही, म्हणून सांगितले.
वाहकाच्या या लहरी वर्तणुकीमुळे सर्व प्रवासी अवाक झाले. परंतु नाइलाजाने स्टेशनवरून उतरून रिक्षाने वंदना टॉकीजकडे गेले. स्वामी यांनी निलंगा येथे परत आल्यानंतर १८ मार्चला स्वारगेट आगाराकडे माहिती अधिकारांतर्गत विचारणा केली असता १ एप्रिलला या गाडीस लोणावळा येथे स्टॉप नाही. तथापि, ही बस ठाणे आगाराची असल्याने ठाणे विभाग नियंत्रकाकडे चौकशी करा, असे उत्तर आले. त्यानुसार स्वामी यांनी १४ एप्रिल २०१० रोजी ठाणे विभाग नियंत्रकाकडे या बाबत विचारणा केली. त्यांनी त्या दिवशीचे चालक बी. डी. जाधव व वाहक एस. जी. भोपे असल्याचे कबूल केले. पण लोणावळ्याचे प्रवासी का घेतले, याचा समाधानकारक खुलासा न केल्याने स्वामी यांनी राज्य माहिती आयुक्ताकडे अपील सादर केले.
औरंगाबाद माहिती आयुक्त खंडपीठासमोर गेल्या ५ जुलैस या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी जनमाहिती व अपिलीय अधिकारी अनुपस्थित होते. सुनावणीत स्वामी यांनी या प्रकरणातील सर्व वस्तुस्थिती कोर्टासमोर सादर केली. या बाबीची गंभीर दखल घेऊन राज्य माहिती आयुक्तांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना फटकारले व तक्रारधारक स्वामी यांना एक हजार रुपये नुकसानभरपाई ठाणे विभाग नियंत्रकांनी द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यानुसार महामंडळाने ३१ ऑक्टोबरला एक हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा धनादेश स्वामी यांना दिला. एकंदरीत या प्रकरणात महामंडळाच्या लहरी चालक व वाहकांचा महामंडळाला फटका बसला. प्रवाशांना मात्र या निर्णयाने दिलासा मिळाला. 

Story img Loader