नाशिक जिल्ह्य़ातून भुजबळराज गाडून टाकण्याचे तसेच गटबाजी विसरण्याचे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांना करतानाच संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी पुन्हा गद्दारी कराल तर पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशाराही गद्दारांना दिला.
येथे नांदगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ग्रामीण जिल्हाप्रमुख जयंत दिंडे यांची बढती, कारभारी आहेर यांची दिंडेंच्या जागी झालेली नियुक्ती या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी मिर्लेकर यांनी संवाद साधला. माजी आमदार संजय पवार यांनी शिवसेना सोडल्यानंतरचा हा पहिलाच मोठा मेळावा झाला. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विजय करंजकर, कारभारी आहेर, दत्ता गायकवाड, माजी आमदार कल्याणराव पाटील, संघटक सुहास कांदे आदी उपस्थित होते. या वेळी मिर्लेकर यांनी िदडेंना बढती मिळाली, आहेरांची नियुक्ती झाली, हे बदल तालुक्यातील शिवसैनिकांनी स्वीकारण्याचा सल्ला दिला. तालुक्यात विधानसभा आणि पालिका निवडणुकीत शिवसेनेला हार पत्करावी लागली. याविषयी आत्मचिंतन करून यापुढे बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नांदगाव तालुक्यात तसेच मनमाड शहरात नागापूर, पानेवाडीत गेल्या चार वर्षांत काय घडले याचा सविस्तर अहवाल आपल्याकडे आहे. गद्दारांना एकदा माफ केले आहे. पुन्हा गद्दारी कराल तर पक्षातून हकालपट्टीशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा मिर्लेकर यांनी दिला. माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांनी यापुढील काळात सर्व गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून संपूर्ण ताकदीनिशी तालुक्यात पुन्हा भगवा फडकविण्याचा निर्धार केला.

Story img Loader