प्राण्यांना न्याय मिळावा म्हणून त्याच्यासाठी माणूस धावून येण्याची घटना फार क्वचित घडते.  किंबहूना मानवी चुकीमुळे प्राण्यांचा मृत्यू झाल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार (एफआयआर) दाखल केल्याचे उदाहरण आजपर्यंत तरी कुठे ऐकिवात नाही. मात्र, राज्याच्या उपराजधानीत कुत्र्याच्या मृत्यूसाठी महावितरणला दोषी ठरवत त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महावितरण असो किंवा खासगी वीज वितरण कंपनी विजेचा सावळागोंधळ कायम असतो. त्यांच्या या गलथान कारभाराचे चटके कित्येकदा नागरिकांनाच सोसावे लागतात. कधी यातून मानवी मृत्यूही घडून आलेत, पण त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यापर्यंत तक्रारीचा सूर कदाचित गेला नसावा. दुसरीकडे रस्त्यावर एखादे कुत्रे वा मांजर मरून पडले असेल तरी त्याला बेदखल करून समोर निघून जाणारीही माणसेच आहेत. मात्र, महावितरणच्या गेल्या अनेक वर्षांंच्या चुकीचा फटका कुत्र्याला बसला आणि त्याच्यावर मृत्यू ओढवला.
गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यांचा कहर कायम असल्याने शहरात ठिकठिकाणी झाडे आणि त्यामुळे वीज वाहिन्यांच्या तारा तुटण्याचे प्रकार घडून येत आहेत. प्रतापनगरमधील गावंडे लेआऊटमध्येही ४ मेच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यामुळे के-३३५ या वीज खांबावरून मुख्य वाहिनीचा तार तुटून त्या खांबाखालून जाणाऱ्या कुत्र्याच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास प्रवेश सावलिया या युवकाला बेवारस कुत्रा वीज तारांखाली मरून पडल्याचे दिसले आणि त्यांनी महावितरणला भ्रमणध्वनीवरून याची सूचना दिली. मात्र, तब्बल अडीच तासाने महावितरणचे कर्मचारी गाडी घेऊन आले. वाहन नसल्याने उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले.
या खांबावर नेहमीच तारा तुटतात आणि त्या बदलविण्याऐवजी महावितरणचे कर्मचारी त्याला कापून व जोडून पुन्हा वीज सुरळीत करतात. याठिकाणी तुटलेल्या वायर गुंडाळून तशाच ठेवण्याचे प्रकार नेहमीच घडतात आणि वादळीवारे सुटले की या तारा खाली पडतात. यापूर्वीही कित्येकदा महावितरणकडे तक्रार करण्यात आली, पण त्यांनी दखल घेतली नाही. आजपर्यंत याठिकाणी जीवित हानी झाली नसली तरीही कुत्र्याच्या मृत्यूने धोक्याची घंटा मात्र दिली आहे. त्यामुळेच अखेर महावितरणविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची वेळ आली. या घटनेने तरी महावितरणला जाग येईल, अशी अपेक्षा तक्रारकर्ते प्रवेश सावलीया यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा