अकोट येथील शिवसेना आमदार संजय गावंडे यांच्या विरोधात काल, बुधवारी अकोट पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तब्बल १८ दिवसांपूर्वी झालेल्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर हे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाला राजकीय किनार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  
 आमदार संजय गावंडे यांच्यासह १५० लोकांवर दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने बेछूटपणे प्रक्षोभन करणे, एकोपा टिकविण्यास बाधा आणणे, बेकायदेशीर जमाव करणे, अशा विविध प्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले. या प्रकरणात अकोट पोलीस ठाण्याचे ठाणेदार भास्कर तंवर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अकोट येथे झालेल्या जातीय दंगलीपूर्वी देवीच्या मूर्तीची विटंबना झाली होती. यावेळी आमदार गावंडे यांनी समाजकंटकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली होती, तसेच ठिय्या आंदोलन केले होते. ही घटना १९ ऑक्टोबर रोजीची आहे. त्यानंतर काही दिवसांनी अकोट येथे जातीय दंगल झाली होती. आज तब्बल १८ दिवसांनी आमदार संजय गावंडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आमदार संजय गावंडे यांच्यासह छोटू कराळे, अनंत मिसाळ, संतोष झुनझुनवाला, अनिल जयस्वाल, मनोज रघुवंशी यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणास आता राजकीय किनार लाभत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.    

Story img Loader