एका सुशिक्षित बेरोजगाराला नोकरी लावून देतो म्हणून १० लाख रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचे पुतणे विजय मोघे यांच्यासह शिक्षण संस्थेच्या तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शंकर प्रतापराव शिंदे (रा.पांगरा ता.बसमत, जि. हिंगोली) यांच्याकडून शिक्षकपदासाठी १५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यापैकी १० लाख रुपये त्यांनी दिले व त्यानंतर ५० हजार रुपये बिल काढण्यासाठी मागितले, अशी १० लाख ५० हजार आपण दिल्याची तक्रार शंकर शिंदे यांनी आर्णी न्यायालयात केली. न्यायालयाच्या आदेशान्वये विजय मोघे यांच्यासह आर्णी दत्तरामपूर येथील शिवाजीराव मोघे आदिवासी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला मंगला शेंडे, कळमनुरी सैनिक शाळेचे सहाय्यक शिक्षक राजेश शेळके व पांढरकवडा येथील मोघे महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपीक वसंता शिंदे यांच्यावर आर्णी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मोघे यांच्या तिन्ही संस्थांमधील तीन कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे.
दरम्यान, तक्रारकर्ता न्यायालयात गेलेला असून या प्रकरणाची चौकशी करून न्यायालयात अहवाल सादर करावा, असे न्यायालयाने म्हटले असल्याचे विजय मोघे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले.  

Story img Loader