कळमनुरीत उरसाच्या निमित्ताने लावलेले डिजिटल फलक काढण्यावरून एमआयएमच्या कार्यकर्त्यांने पोलिसावर हात उगारला. पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांला ताब्यात घेऊन ठाण्यात नेताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. पोलिसांनी ‘त्या’ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून लगेच सोडून दिले. या घटनेचा शिवसेना दलित आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला.
कळमनुरीत नुरीबाबा संदल उरसाचा कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध संघटना, कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वागताचे फलक लावले आहेत. मात्र, नगरपालिकेची परवानगी घेऊनच फलक लावावे, असे पोलिसांनी कळवले होते.
विनापरवानगी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फलक लावला. तो काढण्याचा आदेश पोलिसांनी दिला. यावरून शेख एजाज याने पोलिसांवर हात उगारला. पोलिसांना त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. पाठोपाठ एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, उपअधीक्षक राम हाके, पोलीस निरीक्षक रऊफ घटनास्थळी पोहोचले. पोलीस कर्मचारी बाबाराव पोटे यांच्या फिर्यादीवरून शेख एजाज याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. पण लगेच त्याला जामिनावर सोडून देण्यात आले. यानंतर एमआयएम कार्यकर्त्यांनी त्याची मिरवणूक काढली.
या घटनेचा शिवसेना दलित आघाडीच्या वतीने एका पत्रकाद्वारे निषेध करण्यात आला. यात म्हटले आहे, की पोलिसांना मारहाण करणाऱ्याची राजकीय दबावाखाली तत्काळ सुटका करण्यात आल्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचले आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यापुढे जोमाने काम करतील, असा प्रश्न उपस्थित करून कोणाच्याही दबावाला बळी न पडता पोलीस अधिकाऱ्यांनी कायद्याप्रमाणे आपली जबाबदारी पार पाडावी. असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आघाडीचे जिल्हा संघटक जी. डी. मुळे यांनी दिला.
पोलिसावर हात उगारणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा
कळमनुरीत उरसाच्या निमित्ताने लावलेले डिजिटल फलक काढण्यावरून एमआयएमच्या कार्यकर्त्यांने पोलिसावर हात उगारला. पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांला ताब्यात घेऊन ठाण्यात नेताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. पोलिसांनी ‘त्या’ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून लगेच सोडून दिले. या घटनेचा शिवसेना दलित आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला.
First published on: 09-12-2012 at 03:18 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir launched against mim worker fight with police