कामोठे येथील एका कार्यक्रमादरम्यान वाटप करण्यात आलेल्या वादग्रस्त प्रचारपत्रक प्रकरणाची गंभीर्याने दखल घेत कामोठे पोलिसांनी आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती आणि आरक्षण कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सेक्टर ३५ येथील मायक्का मंदिरात रविवारी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने धनगर समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महायुतीलाच मतदान का? या आशयाची पत्रके उपस्थितांना वाटप करण्यात आली.
या पत्रकामध्ये समितीने सरकारने धनगर समाजाच्या विरोधी कसा पवित्रा घेतला याबाबतचे विवेचन मांडले होते. या प्रकराची माहिती मिळताच कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार, पोलीस नाईक भूषण पाटील, चेतन आहिरे यांनी आयोजकांना ही पत्रके वितरित करण्यास मनाई केली. यानंतर तातडीने ही पत्रके गोळा करण्याचे काम आयोजक अशोक मोटे यांनी केले. या पत्रकांवर प्रसिद्ध करणाऱ्याचे नाव नसल्याने या पत्राची नोंद करून या प्रकाराबद्दल पुढील कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण वर्ग केल्याचे मुल्लेमवार यांनी सांगितले. याबाबत आयोजकांवर आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader