मोठय़ा प्रमाणात वनसंपदेचे नुकसान
तालुक्यातील पाटणादेवी अभयारण्यात लोंजे शिवारात तीन दिवसांपासून लागलेल्या आगीवर ३६ तासानंतर नियंत्रण मिळविण्यात वन विभाग आणि परिसरातील ग्रामस्थांना यश आले. या आगीत मोठय़ा प्रमाणात वनसंपदेचे नुकसान झाले आहे.
जंगल परिसरात आग लागण्याचे प्रकार नेहमीच घडत असले तरी अल्पशा फायद्यासाठी जंगल पेटवून देण्याचे प्रकारही घडत असतात. अभयारण्यात मोहाची फुले वेचण्यासाठी, लाकूडतोड करण्यासाठी, शिकारीसाठी असे प्रकार नेहमीच घडतात. त्यात बहुमोल झाडांसह पशुपक्ष्यांची अंडीही भस्मसात होतात. वन विभागात लागलेली आग विझविण्यात लोंजे येथील ग्रामस्थानी वन कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. आग विझविण्यासाठी वन विभागाकडे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. आग विझविण्याचे प्रशिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे झाडाच्या फांद्या तोडून त्यांच्या सहाय्याने आग विझविताना अनेक जण जखमी झाले. सहाय्यक उपवन संरक्षक जयकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे कर्मचारी व सातकुंड तसेच लंगडाकांदा या गावातील ३० ते ३० तरूणांनी आग विझविण्याचे काम केले. त्यात वन परीक्षेत्र अधिकारी एल. एल. राठोड, वनरक्षक भालेराव, वनपाल पाटील, वनमजूर निजाम हे जखमी झाले. त्यांच्यावर वन्य जीवरक्षक राजेश ठोंबरे यांनी प्राथमिक उपचार केले. वनसंपदेच्या संरक्षणासाठी पाटणादेवी अभयारण्यात जुनौने पीर आणि मल्हार टेकडी येथे दोन मनोरे कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

Story img Loader