खारघर येथील सेक्टर १२ मधील रो-हाऊसमध्ये गुरुवारी सायंकाळी आग लागली. सुखदेव रसाळ यांचे कुटुंब या रो-हाऊसमध्ये राहतात. रसाळ यांच्या रो- हाऊसमध्ये तळमजल्यावर वेिल्डगचे काम सुरू असताना सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी ही आग लागली.
रसाळ यांनी तळमजल्यावर फोटोफ्रेमसाठी लागणारे साहित्य आणून ठेवले होते. त्यावर वेिल्डगच्या ठिणग्या पडल्याने आगीने पेट घेतल्याची शक्यता खारघर अग्निशमन दलाचे अधिकारी एस. एम. शिंदे यांनी वर्तविली केली. आगीचे मोठे स्वरूप, धुराचे लोट पाहून तळमजल्यावरून बाहेर येण्यासाठी मार्ग नसल्याने रो-हाऊसमधील महिला व पुरुषांनी गच्चीवर धाव घेतली. यामध्ये एक महिला घाबरून शेजारच्या गच्चीवर उडी मारताना जखमी झाली. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवून कसेबसे रो- हाऊसमध्ये शिरले. त्यानंतर जवानांनी गच्चीवरील शरणार्थीना सुखरूप बाहेर काढले. यावेळी अजून एका महिलेला किरकोळ प्रमाणात दुखापत झाल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले. जखमींपैकी रोशनी (पूर्ण नाव माहीत नाही) यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पोलिसांनी दाखल केले. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. खारघरमध्ये अग्निशमन दलाचे केंद्र सिडकोने नुकतेच सुरू केले आहे. हे केंद्र जवळ असल्याने या आगीवर दोन तासांमध्ये नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले. खारघरवासीयांनी आपत्तीवेळी अग्निशमन दलाचा दूरध्वनी क्रमांक ०२२-६४५१३३५१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन अग्निशमन दलातर्फे करण्यात आले आहे.

Story img Loader