शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चितेची धग आता शांत झाली असली तरी त्यांच्या निधनामुळे पेटलेली वेदनेची आग अजूनही शिवसैनिकांच्या मनात धुमसत असल्याचे चित्र सोमवारी शिवाजी पार्कवर दिसत होते.
हजारो शिवसैनिकांनी सोमवारी पुन्हा एकदा शिवतीर्थाला भेट देऊन बाळासाहेबांच्या चितेचे अंत्यदर्शन घेतले. अनेक कार्यकर्ते चितेवरील राख कपाळाला लावून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचे भेटण्याचा अनुभव घेत होते. तर काहीजण फुले, उदबत्या पेटवून, हात जोडून श्रद्धांजली वाहत होते.
अंत्ययात्रा लांबल्याने रविवारी शिवसैनिकांना बाळासाहेबांचे अखेरचे दर्शन घेता आले नाही. १०-१२ तास वाट पाहूनही आपल्या लाडक्या नेत्याला डोळे भरून पाहता न आल्याची हळहळ शिवसैनिकांना आहे. त्यांच्या चितेचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या अनेक शिवसैनिकांनी ही हळहळ बोलूनही दाखविली. यातले बरेचजण आदल्या दिवशी अंत्यसंस्काराच्या वेळेस उपस्थित होते. परंतु, जवळून दर्शन न झाल्याने त्यांनी आज पुन्हा एकदा शिवाजी पार्कची वाट धरली. मुंबईबाहेरील कार्यकर्ते जे काल येऊ शकले नाही त्यांनीही आजची वेळ साधून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. काही कार्यकर्ते तर आपल्या पत्नी व लहान मुलांसह बाळासाहेबांच्या चितेची राख मस्तकी लावत होते.
शिवाजी पार्कहून काहीच अंतरावर असलेल्या शिवसेना भवनात मात्र सोमवारी शुकशुकाट होता. सेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या शिवाजी पार्क आणि दादर परिसरातील व्यवहारही सुरळीत सुरू होते. सोमवारी येथील बहुतांश दुकाने बंद असतात. त्यामुळे, रस्त्यांवर फारशी गर्दी नव्हती.

Story img Loader