१२८६० डाऊन मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस सोमवारी सकाळी भरधाव मनमाड रेल्वे स्थानकाकडे येत असताना अचानक या गाडीतील इंजिनच्या केबीनमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. हा प्रसंग पाहताच जागरूक प्रवाशांनी आरडाओरड केल्यामुळे येथील स्थानकावर गाडी थांबवून मदतकार्य करण्यात आले. ४५ मिनिटांनंतर पर्यायी इंजिन लावून ही एक्स्प्रेस पुढे मार्गस्थ करण्यात आली.
गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमधील केबलमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने ही केबल जळाली. त्यामुळे आग व धूर निघाला. मनमाड रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा नव्हता. प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबविली. अन्यथा गाडीला दोन तासानंतर भुसावळ येथे थांबा आहे. तेव्हा मोठा अनर्थ घडू शकला असता, अशी प्रवाशांची प्रतिक्रिया आहे. इंजिनच्या केबीनमधून धूर येत असल्याचे पाहून चालकाने ही रेल्वे मनमाड स्थानकावर फलाट क्रमांक दोनवर थांबविली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या यातायात पथकाने तातडीने मदतकार्य केले व सुमारे पंचेचाळीस मिनिटानंतर या गाडीला दुसरे पर्यायी इंजिन लावून ती पुढे सोडण्यात आली.
वास्तविक, प्रत्येक रेल्वेगाडी ज्या स्थानकातून सुटते, तिथे इंजिनची तपासणी केली जाते. या रेल्वेच्या इंजिनची मुंबई येथून निघताना तपासणी झाली होती की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले.
सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी येथे आलेली ही गाडी ११ वाजून २० मिनिटांनी म्हणजे ४५ मिनिटे उशिराने पुढे मार्गस्थ झाली. याबाबत तातडीने माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिली.
गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनला
१२८६० डाऊन मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस सोमवारी सकाळी भरधाव मनमाड रेल्वे स्थानकाकडे येत असताना अचानक या गाडीतील इंजिनच्या केबीनमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. हा प्रसंग पाहताच जागरूक प्रवाशांनी आरडाओरड केल्यामुळे येथील स्थानकावर गाडी थांबवून मदतकार्य करण्यात आले.
First published on: 05-03-2013 at 02:10 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire ot geetanjali express engine