डिसेंबर २०११ मध्ये कोलकात्यातील एएमआरआय रुग्णालयाच्या भीषण आगीमध्ये होरपळून ८९ लोकांना जीव गमवावा लागला होता. या घटनेतून धडा घेत केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालये, कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक सेवा, शासकीय इमारतींच्या अग्निसुरक्षेची मोठी चर्चा होऊन त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली होती. मात्र यातून कोणताच धडा रेल्वे प्रशासनाने अद्याप घेतलेला नसून, उपनगरी रेल्वे गाडीत आगीच्या घटना वारंवार घडत असूनही लोकल डब्यात अग्निसुरक्षेची कोणतीच यंत्रणा कार्यान्वित झाली नसल्याचे दिसून येत आहे. रेल्वे स्थानकातील अग्निसुरक्षाही ढेपाळलेलीच असून मुंबईतील कोटय़वधी प्रवाशांची जीवनवाहिनी असलेला उपनगरी रेल्वे प्रवास असुरक्षितच असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.
ठाणे रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या लोकलच्या मोटर कोचला शुक्रवारी आग लागली होती. सुदैवाने कोच रिकामी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या प्रकारे मोटर कोचला आग लागण्याची ही पहिली घटना नसून ओव्हरहेड वायर आणि पॅन्टॉग्राफच्या घर्षणामुळे ठिणगी पडून मोटर कोचला आग लागण्याच्या घटना अलीकडे घडलेल्या आहेत. तरीही रेल्वे प्रशासन अग्निसुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.
अनेक वेळा चालत्या लोकलमध्येही अशा प्रकारची आग लागल्याची घटना २०१२ मध्ये कल्याणजवळ घडली होती, तर कळवा कारशेडमध्येही लोकलला आग लागली होती. अशा घटनांच्या प्रसंगी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन प्रचंड गोंधळ उडत असतो. डब्यातील साखळी खेचणे हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर असतो. लोकल डब्यामध्ये अग्निसुरक्षेची प्राथमिक यंत्रणा उपलब्ध झाल्यास त्याचा वापर प्रवासीही योग्य पद्धतीने करू शकतात.
ज्यामुळे आग मर्यादित असतानाच तिच्यावर नियंत्रण राखणे शक्य होईल अशी व्यवस्था करण्यात येणे आवश्यक आहे, असे मत उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या जिवाशी खेळ..
प्रवाशांना वाहतुकीची सुविधा देताना त्यांच्या जिवाची काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. या गोष्टीचा विसर पडलेले रेल्वे प्रशासन लोकल गाडय़ांमध्ये अग्निसुरक्षेची कोणतीच उपाययोजना अमलात आणत नसून हा प्रवाशांच्या जिवाशी चाललेला खेळ आहे. रेल्वेने तात्काळ या गोष्टींची पूर्तता करण्याची गरज आहे. अन्यथा मोठी घटना घडेपर्यंत रेल्वे त्याकडे लक्ष देत नाही ही सद्यस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख यांनी दिली.
स्वतंत्र यंत्रणा हवी..
रेल्वे देशातील सर्वात मोठी वाहतूक व्यवस्था असून तिचा स्वतंत्र अर्थसंकल्प व पोलीस यंत्रणा आहे. त्याचप्रमाणे रेल्वेची स्वतंत्र अग्निशमन व्यवस्थाही असणे गरजेचे आहे. शहरातील यंत्रणा अपघातस्थळी पोहोचेपर्यंत बराच वेळ लागतो. रेल्वेची यंत्रणा असल्यास हानी टळू शकते, असे मत उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे मधू कोटियन यांनी सांगितले.
रेल्वेची सुरक्षा पुरेशी..
लोकल गाडय़ांच्या गार्ड आणि मोटरमन यांच्याकडे अग्नी विझवण्यासाठी लागणारी प्राथमिक यंत्रणा उपलब्ध असते. तसेच उपनगरीय रेल्वेची सर्व स्थानके जवळ असून प्रत्येक स्थानकामध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा तात्काळ उपलब्ध होत असते, तर शहरांच्या अग्निशमन दलाचीही मदत जलद गतीने होत असते. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण होत नाही. लांब पल्ल्याच्या एसी कोचमध्ये अग्निसुरक्षेची यंत्रणा उपलब्ध असून तेथील कर्मचारीही प्रशिक्षित असल्याने ते प्रवाशांची पुरेशी काळजी घेऊ शकत असतात. रेल्वे प्रशासनाची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा नसली तरी आताची व्यवस्था पुरेशी आहे, असा दावा रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी केला.
लोकल प्रवासातील अग्निसुरक्षा वाऱ्यावर..
डिसेंबर २०११ मध्ये कोलकात्यातील एएमआरआय रुग्णालयाच्या भीषण आगीमध्ये होरपळून ८९ लोकांना जीव गमवावा लागला होता.
First published on: 07-01-2014 at 07:11 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire security is neglected in local trains