सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील सेवासदन चौकातील काबरा चेंबरला लागलेल्या आगीत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील काही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे जळाली. तसेच दीपक लालवानी यांच्या गोदामातील लाखो रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तीन तास परिश्रम घ्यावे लागले. दरम्यान, या आगीमागे घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवर काबरा चेंबर नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर मोटारसायकलचे सुटे भाग विक्री, हार्डवेअर व टाईल्सचे दुकान आहे. पहिल्या मजल्यावर दीपक लालवानी यांचे गाद्यांचे व सोफासेटचे स्पंज ठेवण्याचे गोदाम आहे. तर दुसऱ्या मजल्यावर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. तिसऱ्या मजल्यावर इमारतीचे मालक काबरा यांचे कुटुंबीय राहतात. आज सकाळी दहा वाजता गोदाम उघडण्यासाठी नोकर गेले असता त्यांना गोदामातून धूर येताना दिसला. त्यांनी लगेच ही माहिती दीपक लालवानी यांना दिली. त्यांनी अग्निशमन दलाला कळविले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी आले. गोदामातील आग विझवत असतानाच नागपूर जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यालयातून धूर निघताना दिसून आला.
सर्वप्रथम अग्निशमन दलाच्या जवानांनी तिसऱ्या मजल्यावर असलेल्या काबरा कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले. या दोन्ही मजल्यावर पाणी फेकण्यासाठी इमारतीच्या खिडक्यांची तावदाने फोडावी लागली. ही आग विझविण्यासाठी दलाच्या जवानांना जवळपास तीन तास लागले. यावरून या आगीची भीषणता लक्षात येते. या आगीत बँकेतील कागदपत्रे जळाली. या कागदपत्रांमध्ये रोखे व्यवहारातील अत्यंत महत्वाची कागदपत्रे होती, असे सांगितले जाते. तर लालवानी यांच्या गोदामातील साहित्य जळून नष्ट झाले. या आगीमुळे इमारतीच्या भिंतीला तडे गेले आहेत. या आगीत अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आमदार विकास कुंभारेंचा आरोप
या आगीचे कारणही स्पष्ट झाले नाही. आगीबाबत घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर जिल्हा सहकारी बँकेतील १४९ कोटींच्या  घोटाळ्याचा अहवाल पाच दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. या घोटाळ्याची जबाबदारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आमदार सुनील केदार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या बँकेत या गैरव्यवहाराशी संबंधित अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात काही पुरावे उपलब्ध राहू नये यासाठी मुद्दामहूनच आग लावली, असा स्पष्ट आरोप आमदार विकास कुंभारे यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची निपक्ष चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.