उत्तर नागपुरातील कामगार नगरातील एका प्लास्टिकच्या कारखान्याला मंगळवारी सकाळी भीषण आग लागल्याने हा कारखाना जळून बेचिराख झाला.
या कारखान्यात भंगारात खरेदी केलेल्या प्लास्टिकच्या वस्तू बारिक करून तयार झालेला चुरा विदर्भातील विविध ठिकाणी पोती तयार करण्यासाठी विकला जातो. सकाळी रखवालदारासह चौघे कारखान्यात होते. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास आगीचे चटके जाणवू लागल्याने त्यांना जाग आली. आरडाओरड करीत त्यांनी बाहेर धूम ठोकली. तोपर्यंत आग चांगलीच भडकली होती. वारा तसेच ज्वलनशील वस्तूंमुळे ती आग भडभडून पेटली. आगीच्या ज्वाळा आकाशाकडे उंचच उंच झेपावत होत्या. त्यामुळे काळा धूर आसमंतात पसरल्या. आग लागल्याचे दूरवरून दिसत होते. आग लागल्याचे दिसल्याने या परिसरात धावाधाव झाली. कारखान्याच्या शेजारील वस्तीतील लोकांनी घराबाहेर बाहेर धाव घेतली. परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.
आग लागल्याचे समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या दहा गाडय़ांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. सिव्हिल लाईन्स, सुगतनगर, सक्करदरा, गंजीपेठ, लकडगंज व कळमना केंद्रातून आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. सकाळी अकरा वाजेपर्यंत आग विझवण्यात यश आले. त्यानंतरही ढिगाऱ्यातून धूर धुमसत होता. संपूर्ण कारखाना, त्यातील प्लास्टिक आगीत बेचिराख झाले. केवळ यंत्राचा लोखंडी सांगाडा तेवढा शिल्लक राहिला. आगीत नक्की किती नुकसान झाले हे स्पष्ट झाले नसले तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. शॉट सर्किटने आग लागली असावी, असे बोलले जात होते.