तामीळनाडूतील फटाकडय़ांची पंढरी शिवकाशीला लागलेली आग, स्थानिक प्राधिकरणांनी लावलेले भरमसाठ भुईभाडे, अग्निशमन दलाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी द्यावी लागणारी चिरीमिरी, पोलिसांचे हप्ते अशा अनेक कारणांनी पूर्वी हमखास नफा देणारा धंदा असणारे फटाक्यांचे दुकान आता नको रे बाबा असे म्हणण्याची विक्रेत्यांवर आली आहे. या सर्व कारणांमुळे उत्पन्न ५० टक्क्य़ांपेक्षा कमी आले असून रात्री उशिरापर्यंत जागण्याची शिक्षा भोगावी लागत असल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे पुढच्या वर्षी हा धंदा करायचा की नाही या विचारात हे विक्रेते आहेत.
फटाक्यांची क्रेझ लक्षात घेऊन स्थानिक रहिवाशांपैकी हुन्नरी तरुण हा उद्योग करण्यासाठी पुढे धजावत. मात्र अलीकडे हे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे गतवर्षी वाशी आणि ऐरोली येथे दुकाने असणाऱ्या सहा असणारी सहा विक्रेत्यांनी या वर्षी फटाक्याच्या व्यवसायात हातच घातला नाही.
पूर्वी फटाक्यांचा धंदा म्हणजे हमखास नफ्याची दुप्पट हमी देणारा होता पण आता ही स्थिती राहिलेली नाही, असे कमलाकर मढवी या ऐरोलीतील फटाके विक्रेत्याने सांगितले.
मध्यंतरी फटाक्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शिवकाशी येथे भीषण आग लागली. त्यात अनेक कारखाने भस्मसात झाले. त्यामुळे यावर्षी फटाक्यांच्या किंमती गतवर्षीपेक्षा १५ ते २० टक्के वाढल्या. त्यामुळे अॅटमबॉम्ब, पाऊस, फुलबाजी, लवंगी मिर्ची, डांबरी माळा, महाग झाल्या आहेत. हे फटाके अधिक खपणारे आहेत. तशात नवी मुंबईत फटाक्यांच्या दुकानदारांना दोन प्रकारचे भाडे भरावे लागत आहे. काही ठिकाणी जमीन ही सिडकोची असल्याने त्यांना सिडकोकडे भुईभाडे द्यावे लागत आहे तर या व्यवसायाची परवानगी देणारे अधिकार पालिकेकडे असल्याने त्यांना तेथेही वेगळे भाडे भरावे लागत आहे. याव्यतिरिक्त अग्निशमन दलाची परवानगी आववश्यक असते. या कामासाठी अधिकृत शुल्कासह चिरीमिरी देण्याशिवाय पर्याय नसल्याचे वाशीतील एका विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. याच एका परवानगीतून अग्निशमन दलाला चांगला मलिदा मिळत असल्याने ते ही परवानगी सहजासहजी देत नाहीत. याशिवाय केंद्रीय आयुक्तांची एक परवानगी घ्यावी लागते. या सर्व सोपस्कारांमध्ये १५ ते २० हजार रुपये केवळ परवानगी शुल्क आणि बंद लिफाफे वाटण्यात जात असल्याने आता हा धंदा नकोसा झाला आहे. त्यात हा धंदा करताना विश्वासू व्यक्ती असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सर्वाचे जागरण, परिश्रम यांचे मूल्य देण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे पूर्वी दामदुप्पट नफा देणारा हा व्यवसाय आता हात भाजणाराच ठरत असल्याने नवीन पिढी याकडे वळत नसल्याचे स्वप्नील खेडकर याने सांगितले.
या व्यवसायातील उत्पन्न आणि नफा डोळ्यात बसल्याने आता काही समाजकंटक खोटय़ा नोटा देऊन फटाकडय़ांची खरेदी करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे काही बडय़ा विक्रेत्यांनी नोटा स्कॅनिंग करणारी मशिन ठेवली असल्याचे ठाण्यातील विक्रेत्यांनी सांगितले.
फटाक्यांचे दुकान, आता नको रे बाबा
तामीळनाडूतील फटाकडय़ांची पंढरी शिवकाशीला लागलेली आग, स्थानिक प्राधिकरणांनी लावलेले भरमसाठ भुईभाडे, अग्निशमन दलाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी द्यावी लागणारी चिरीमिरी, पोलिसांचे हप्ते अशा अनेक कारणांनी पूर्वी हमखास नफा देणारा धंदा असणारे फटाक्यांचे दुकान आता नको रे बाबा असे म्हणण्याची विक्रेत्यांवर आली आहे.
First published on: 13-11-2012 at 10:50 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firecrakers feature now i dont want firecrakers shop