दिवाळी आणि फटाके याचे अतूट नाते आहे. शहरात विविध भागात वर्दळीच्या ठिकाणी अनेक फटाके विक्रेत्यांनी नियम डावलून दुकाने थाटली असून त्यांच्यावर  कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील आतापर्यंत महापालिकेकडे केवळ २५०च्या जवळपास दुकानदारांची नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिवाळीच्या पंधरा ते वीस दिवस शहरातील विविध भागात फटाक्याची दुकाने थाटली जात असून त्यांना महापालिकेतर्फे रितसर परवानगी दिली जाते. फटाक्याच्या दुकानांमुळे गेल्या काही वर्षांत लागलेल्या आगीमुळे ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी दुकानांसाठी जागा दिली जाते. तुळशीबाग, उत्तर नागपुरात इंदोरा चौकातील मैदानात, पश्चिम नागपुरात जयताळा परिसरात मध्य नागपुरात गांधीबाग परिसरातील मोकळ्या जागेत दुकाने थाटण्यासाठी परवानगी देण्यात आली असली तरी फटाके विक्रेत्यांची संख्या बघता अनेकांनी जागा मिळेल त्या जागी दुकाने थाटली आहे. अनेकांनी महापालिकेची परवानगी न घेता महाल, गांधीबाग, सक्करदरा, लक्ष्मीभवन, गोकुळपेठ, इतवारी अशा वर्दळीच्या ठिकाणी दुकाने थाटली आहे.
शहरात जवळपास ५०० ते ६०० जवळपास छोटी मोठी फटाक्याची दुकाने थाटण्यात आली असली तरी महापालिकेत २५० च्याजवळपास फटाके विक्रेत्यांनी नोंदणी केली असून त्यांना रितसर परवाना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवर मोठय़ा प्रमाणात फटाक्याची दुकाने असून त्या दुकानांच्या आजूबाजूला कापड, फर्निचर व औषधांची दुकाने आहेत. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील अनेक फटाके विक्रेत्यांकडून वर्षभर फटाक्यांची विक्री केली जाते.  काही दुकानदारांनी खास दिवाळीनिमित्त रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत.
बडकस चौक ते इतवारीकडे जाणाऱ्या वर्दळीच्या मार्गावर अनेक फटाके विक्रेत्यांनी दुकाने लावली आहेत. त्यातील अनेकांनी महापालिकेची रितसर परवानगी घेतली नसल्याची माहिती मिळाली. काही फटाके विक्रेत्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, वर्दळीच्या ठिकाणी फटाक्याची दुकाने लावण्यावर बंधने आणली असली तरी पर्यायी जागा मात्र उपलब्ध करून देत नाही त्यामुळे मिळेल त्या जागेवर दुकाने थाटून व्यवसाय करावा लागतो.
या संदर्भात महापालिकेचे कार्यकारी सहायक स्थानाधिकारी पी. एन कावळे यांनी सांगितले, सिव्हील लाईनमधील कार्यालयात आतापर्यंत १७३ फटाके विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे. अन्य शहरातील अग्निशमन विभागाच्या कार्यालयात नोंदणी सुरू आहे. फटाके विक्रेत्यांसाठी महापालिकेने काही ठराविक ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली असून ज्यांना फटाके विक्रीचा परवाना दिला आहे त्यांनाच त्या ठिकाणी दुकाने लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. लवकरच वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या फटाके विक्रेत्यांकडे परवाना आहे की नाही याची चौकशी केली जाणार आहे.

Story img Loader