महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंच्या वादातून शुक्रवारी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रसाद सुजित चव्हाण याच्या दिशेने मोटारीवर गोळीबार करण्यात आला. मात्र गोळ्या त्याच्या मोटारीस लागल्या. हा प्रकार युद्धवीर मानसिंग गायकवाड याच्याकडून घडला. माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचा युध्दवीर हा नातू आहे. तर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांचा प्रसाद हा नातू आहे. यामुळे राजकीय वादातून गोळीबार घडला का याची चर्चा शहरात शुरू होती. तथापि ही घरगुती बाब असल्याने ती सामंजस्याने मिटवू असे दोंन्ही कुटुंबीयांच्यावतीने सांगण्यात आले. याप्रकरणी युध्दवीर गायकवाड याच्याविरूध्द शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.    
येथील विवेकानंद कॉलेज व न्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यावर पडदा टाकण्यात आला होता. मात्र हे प्रकरण आज पुन्हा उफाळून आले. आदिती कॉर्नर परिसरातील किरण बंगल्यावजळ प्रसाद चव्हाण हा त्याच्या मित्राशी बोलत उभा होता. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास युध्दवीर हा शिवमसिंग व उत्कर्ष या मित्रांच्याबरोबर इनोव्हा मोटारीतून तेथे आला. त्याने प्रसादच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील दोन प्रसादच्या मोटारीच्या काचेला लागून एक फुटली. तर दुसरी गोळी समोरच्या भिंतीत घुसली. गोळीबार चुकविण्यात प्रसाद व त्याचा मित्र यशस्वी ठरले. गोळीबारातून बचावलेला प्रसाद शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोचला. तेथे त्याने युध्दवीर, शिवमसिंग व उत्कर्ष यांच्याविरोधात गोळीबार केल्याची तक्रार दाखल केली. प्रसाद याच्यावर गोळीबार झाल्याचे समजल्यावर त्याचे मित्र शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या दारात मोठय़ा प्रमाणात दाखल झाले. प्रसाद हा शिवसेनेच्या युवा मोर्चाचे नेतृत्व करतो. त्यामुळे शिवसैनिकही पोलीस ठाण्यासमोर गर्दी करू लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी युध्दवीर, शिवमसिंग व उत्कर्ष यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात भा.द.वी.१४३, १४७, १४८, १४९, ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रतनसिंग रजपूत यांनी पत्रकारांना दिली.    दरम्यान, घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले. त्यांनी परिसराची कसून तपासणी केली. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही तेथे आले होते. पोलिसांना तपासादरम्यान झाडण्यात आलेल्या दोन गोळ्यांच्या पुंगळ्या आढळल्या.     गोळीबाराच्या प्रकारानंतर कोल्हापुरात यामागे राजकीय संदर्भ आहे का, याची चर्चा सुरू झाली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मानसिंग गायकवाड यांचा युध्दवीर हा कनिष्ठ मुलगा आहे. तर, प्रसाद हा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांचा नातू आहे. दरम्यान, हा प्रकार आमचा घरगुती मामला असल्याने तो सामंजस्याने मिटवून घेतला जाईल, असे मानसिंग गायकवाड व रामभाऊ चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा