उंटखान्यात बुधवारी रात्री झालेला गोळीबार तरुणीच्या छेडखानीतून झाल्याचे उघड झाले असून या घटनेचा व रात्रभरात दोन ठिकाणी पोलिसांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा संबंध असल्याची पोलिसांची शंका
आहे.
उंटखान्यात रोशन ज्ञानेश्वर समरीत (रा. इतवारी, तेलीपुरा), त्याचा मित्र व दोन तरुणी खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. तेथेच ते पाणीपुरी खात होते. रात्री सात ते सव्वासात वाजताच्या सुमारास मोटारसायकलवर दोघे तेथे आले. त्यापैकी एकजण पुढे आला. ‘तु त्याला मोबाईल क्रमांक का सांगितला नाही’ असे म्हटले. त्यावर रोशनने त्याला जाब विचारला. तो पळू लागल्याने रोशन त्याच्या मागे धावला. रस्त्याच्या पलीकडे ‘होम फॉर एजेड’च्या कोपऱ्यावर तो तरुण त्याच्या हाती लागला. तेवढय़ात काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरील तरुण तेथे आला. त्याने रोशनच्या दिशेने गोळी झाडली. डाव्या खांद्यावर गळ्याजवळ गोळी लागून रोशन खाली पडला. ते पाहून मोटारसायकलवरील दोघे पळून गेले.
रोशनचा मेडिकल रुग्णालयात रात्री दहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. इमामवाडा पोलिसांनी याप्रकरणी दोन अनोळखी तरुणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. शवविच्छेदनानंतर गुरुवारी दुपारी रोशनचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
आरोपी गांधीसागरापासून त्या दोन तरुणींचा पाठलाग करीत होते आणि मोबाईल क्रमांक विचारीत बराचदा संवादही साधायचा प्रयत्न केला. रोशन अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. पिस्तुलासारखा देशी कट्टा होता व ज्या स्टाईलने मारेकऱ्याने तो काढला आणि गेला, त्यावरून ते सराईत असावेत, अशी पोलिसांची खात्री
आहे. त्यानंतर नंदनवनमध्ये देशी कट्टय़ाचा धाक दाखवून लुटमारीच्या दोन घटना घडल्या.
तेथे व ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर पोलिसांवर गोळीबार झाला. तेथे काही देशी कट्टे सापडले. त्यावेळी वापरलेला देशी कट्टा,  पाहता या सर्व घटनेत आरोपी सारखेच असावेत, अशी पोलिसांची दाट शंका आहे.

Story img Loader