खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटलेल्या आणि यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळात दबदबा निर्माण केलेल्या काँग्रेसचा माजी नगरसेवक प्रवीण दिवटे याच्यावर  रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी प्राणघातक हल्ला करून गोळीबार केला. शिवाय, त्याला छातीत चाकूने भोसकण्यातही आले. तीन पकी एक गोळी हाताला चाटून गेली, तर एक पोटात आणि दुसरी कमरेत शिरली.
मोटारसायकलवर आलेले बुरखाधारी दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. शनिवारी रात्री प्रवीणचे वडील दत्तुजी दिवटे यांचे वृध्दापकाळाने आठवडी बाजार येथील घरी निधन झाले. दुपारीच त्यांच्यावर अत्यंसस्कार करण्यात आले. रात्री प्रवीण दूरध्वनीवर बोलत असतांना अचानक दोन मोटारसायकलवर आरोपी तोंडाला  फडके गुंडाळून आले अन् त्यांनी प्रवीणवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला प्रवीण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तेथे हजर असलेल्या त्याच्या मित्रांनी लगेच त्याला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी दोन्ही गोळ्या प्रवीणच्या शरिरातून बाहेर काढल्या. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या लोकांनी हल्लेखोरांवर जोरदार दगडफेक केली. तरीही हल्लेखोर पसार होण्यात यशस्वी झाले.
ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरताच शहरातील सर्व व्यवहार पटापट बंद झाले. टोळी युध्दाच्या भीतीपोटी शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्रवीण दिवटेच्या दोन समर्थकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक प्रवीणच्या घरी, तसेच रुग्णालय परिसरात तनात केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस निरीक्षक चंदनसिंह बयास, निलेश ब्राम्हणे, वडगाव रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाहून तीन रिकामी काडतुसे, मॅग्झीन, चाकू आणि पर्स इत्यादी साहित्य जप्त केले आहे.
प्रकृती धोक्याबाहेर
प्रवीण दिवटेवर रविवारी रात्री शस्त्रक्रिया करून गोळ्या काढण्यात आल्यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजता त्याला नागपूरच्या शासकीय इस्पितळात हलविण्यात आले. प्रवीणची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा