महाराष्ट्र केसरी पहिलवान संजय पाटील खून खटल्यातील मुख्य आरोपी गुंड सलीम महंमद शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्यावर कराडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात २२ ते ३० वयोगटातील पाच अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेने शहर परिसरात एकच खळबळ उडाली.
ही घटना घडताच पोलिसांनी शहराची तत्काळ नाकाबंदी केली, पण हल्लेखोर मिळाले नाहीत. गोळीबाराच्या या घटनेचा महाराष्ट्र केसरी पहिलवान संजय पाटील खूनप्रकरणासह विविध अंगाने व सर्व त्या शक्यता गृहीत धरून कसून तपास केला जाणार असल्याचे कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी सांगितले. आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस पथके रवाना झाली आहेत. मात्र, ती कोठे गेली आहेत याबाबत माहिती देण्यास घट्टे यांनी नकार दिला.
११ वाजून १० मिनिटांच्या सुमारास गोळीबार केल्याने सल्या चेप्या याच्यावर झालेल्या गोळीबाराची फिर्याद अय्याज शहानवाज रोहिले यांनी शहर पोलिसात दिली आहे. गंभीर जखमी असलेला सलीम शेख सध्या येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, त्याला दोन गोळय़ा लागल्या आहेत. एक गोळी उजव्या मनगटाला लागली, तर दुसरी मणक्यात घुसल्याने गंभीर दुखापत झाली आहे. अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, या हल्ल्याशी आणि गुन्हेगारी जगताशी काहीएक संबंध नसणारे महादेव गुजले व प्रशांत दुपटे (दोघेही वय २४, रा. गोळेश्वर) हे दोघेही या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्याची प्रकृती गंभीर परंतु स्थिर आहे, तर इतर दोघे महादेव गुजले व प्रशांत दुपटे यांची प्रकृती सुखरूप आहे.
२००४ मध्ये दत्तात्रय चव्हाण यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी खटल्याच्या सुनावणीस सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या व या गुन्ह्यातील संजय गुलाब कागदी (रा. शनिवार पेठ, कराड) व बाळू रेठरेकर हे दोन संशयित आरोपी न्यायालयाच्या आवारात आले होते. याच दरम्यान, सलीम शेखवर गोळीबार झाला. सल्या चेप्या याच्या बाजूने चार ते पाच गोळय़ा झाडण्यात आल्या आणि हल्लेखोरांनी केवळ सल्या यालाच लक्ष्य केले होते. असे घट्टे यांनी नमूद केले. सल्यावर गोळीबार होताच न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला आणि या वेळी हल्लेखोर पसार झाले. सल्या चेप्यावरील हल्ल्याचे वृत्त शहर परिसरात वाऱ्यासारखे पसरताच घटनास्थळी गर्दी झाली आणि येथील गोंधळ आटोक्यात आणताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यात पोलिसांचा मोलाचा वेळ वाया गेला. परिणामी हल्लेखोरांना पसार होण्याची संधी मिळाली. सलीम शेखवर सह्याद्री हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून सल्या चेप्याच्या महत्त्वाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असलेल्या सल्या चेप्याला तीन पोलीस अधिकारी व २० पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त आहे. तर अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील हे करीत असल्याचे पोलीस उपअधीक्षक घट्टे यांनी सांगितले. या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर नजीकच्या पोलीस ठाण्यातून व पोलीस चौक्यांमधून बंदोबस्त वर्ग करण्यात आला आहे. हल्लेखोर लवकरच जेरबंद करण्यात पोलिसांना यश येईल असा विश्वास घट्टे यांनी व्यक्त केला आहे.
कुख्यात गुंड सल्या चेप्यावर न्यायालय आवारात गोळीबार
महाराष्ट्र केसरी पहिलवान संजय पाटील खून खटल्यातील मुख्य आरोपी गुंड सलीम महंमद शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्यावर कराडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात २२ ते ३० वयोगटातील पाच अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची घटना आज सकाळी घडली.
आणखी वाचा
First published on: 31-08-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing on hooligan salya chepe in court area