मालमत्ता कर थकविणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचे पाणी बंद!

कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वत:च्या घरापासून करावी हे सूत्र समोर ठेवून कल्याण-डोंबिवली पालिकेच्या करनिर्धारक व संकलक विभागाने पालिका कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कराची नियमित देयके, थकबाकी भरणा केली आहे की नाही याची चाचपणी सुरू करून प्रथम पालिका कर्मचारी राहात असलेल्या सोसायटीचे पाणी तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे कर विभागातील विश्वसनीय सूत्राने सांगितले.
या आक्रमक कर वसुलीमुळे मार्च २०१२ अखेपर्यंत कर विभागाकडून सुमारे १८० ते १८५ कोटीपर्यंत मालमत्ता कराची वसुली होण्याची शक्यता कर विभागाच्या सूत्राने व्यक्त केली. गेल्या वर्षी मालमत्ता कराची वर्षांअखेर १५९ कोटी वसूल करण्यात आली होती. चालू वर्षी या रकमेत सुमारे १५ ते २० कोटींचा लक्ष्यांक गाठण्याच्या हालचाली कर विभागाने सुरू केल्या आहेत. पालिका कर्मचाऱ्याने आपल्या मालमत्तेचा क्रमांक कर विभागात दिल्यानंतर कर भरल्याची खात्री केली जाईल. करभरणा केला नसेल तर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून तो कर्मचारी राहात असलेल्या सदनिकेचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई केली जाईल. तो कर्मचारी राहात असलेल्या सोसायटीने मालमत्ता करभरणा केला नसेल तर, त्या सोसायटीचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे समजते.
हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी ऑक्टोबरमध्ये काही धाडसी निर्णय घेण्यात आले. त्यामुळे दर दिवसाला पालिकेच्या सातही प्रभागांमधून सध्या एकूण सुमारे ६० ते ७० लाख रुपयांचा मालमत्ता कराचा महसूल जमा होत असल्याचे सूत्राने सांगितले. ३१ डिसेंबरपूर्वी मालमत्ता कराची थकित रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांवर दोन टक्के दंडात्मक व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे. गेले अनेक वर्षांपासून थकित करभरणा न करणाऱ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून लिलाव करणे, त्यांची बँक खाती सील करणे, १०० थकबाकीदारांची वर्तमानपत्रात यादी प्रसिद्ध करणे, अशा कारवायाही करण्यात येणार आहेत, असे सूत्राने सांगितले. मालमत्ता करांची वादग्रस्त प्रकरणे सोडविणे, मोकळ्या जमिनीवरील कर करण्याची प्रकरणे मार्गी लावून कर वसुली सुरू करण्यात आली आहे, असे सूत्राने सांगितले.