आदिवासी म्हणजे जणू जंगलातील आणखी एक प्राणच आहेत अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु, ते किती समृद्धपणे जगतात, त्यांची संस्कृती याचे दर्शन घडविण्याबरोबरच कुपोषण, नक्षलवाद, राजकीय-सामाजिक समस्या, सरकार, मिशनरी यांच्यापासून त्यांना होणारा त्रास सहन करून एका आदिवासी कुटुंबाचा प्रवास दाखविण्याचा प्रयत्न ‘तुह्य़ा धर्म कोणचा’ या चित्रपटातून केला आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रात घडणारे कथानक असल्यामुळे अहिराणी बोली या चित्रपटात आहे. प्रथमच अहिराणी बोली चित्रपटात आली असून हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे, असे संवेदनशील दिग्दर्शक सतीश मन्वर यांनी ‘रविवार वृत्तान्त’ला सांगितले.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, सापुतारा पर्वतांमधील प्रदेश या भागात जाऊन चित्रीकरण करण्यात आले असून अहिराणी भाषेची जाण असणाऱ्या व्यक्तींकडून, त्या भागांत राहणाऱ्या लोकांशी चर्चा करून अहिराणी बोली यात वापरली आहे. उपेंद्र लिमये आणि विभावरी देशपांडे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून दत्तप्रसाद रानडे यांनी उत्तर महाराष्ट्रातील आदिवासींचे लोकसंगीताचा वापर करून चित्रपटाला संगीत दिले आहे, अशी माहिती मन्वर यांनी दिली.
‘गाभ्रीचा पाऊस’ या गाजलेल्या पहिल्या चित्रपटानंतर आदिवासींच्या विषयावर चित्रपट करण्याची कल्पना कशी सुचली यावर बोलताना ते म्हणाले की, आदिवासींच्या जीवनावर चित्रपट करावा ही कल्पना ‘गाभ्रीचा पाऊस’च्या आधीपासूनच मनात होती. या चित्रपटाच्या पटकथेला नेदरलॅण्ड्स येथील रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत देण्यात येणाऱ्या ह्य़ुबर्ट बाल्स फंडकडून मान्यता मिळाली आणि यावर आधारित चित्रपटाच्या संशोधनासाठी निधी मिळाला. अशा प्रकारे प्रथमच रॉटरडॅम महोत्सवाकडून मराठी चित्रपटाच्या पटकथेची निवड करण्यात आली असून निधी मिळाल्यामुळे मेळघाट, मध्य प्रदेशपासून ते धुळे, नंदुरबार, इत्यादी परिसरात जाऊन संशोधन करता आले तसेच चित्रीकरणस्थळांचाही शोध घेता आला. शीर्षकाबद्दल बोलताना मन्वर यांनी सांगितले की, ‘तुह्य़ा धर्म कोणचा’ या शीर्षकातील धर्म म्हणजे जीवनपद्धती, जीवनशैली या अर्थाने मांडला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा