शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सोलापूरचे खासदार तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते होते. त्याचे प्रत्यंतर अनोकवेळा पाहावयास मिळाले. बाळासाहेबांनी अथक परिश्रम घेऊन राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता खेचून आणल्यानंतर त्या जोरावर आपली ताकद वाढविण्याचा बराच प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी सहकार क्षेत्रातही पाय रोवण्यासाठी काँग्रेसच्या काही तत्कालीन बडय़ा नेत्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न केला. यात पश्चिम महाराष्ट्राच्या साखर पट्टय़ातील वजनदार नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना सेनेत येण्याचा प्रस्ताव बाळासाहेबांनी दिला होता. परंतु मोहिते-पाटील यांनी तो सपशेल नाकारला. वास्तविक पाहता मोहिते-पाटील यांच्याशी बाळासाहेबांचे घनिष्ठ संबंध होते. मोहिते-पाटील हे सार्वजनिक बांधकाममंत्री असताना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे हे मोहिते-पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘जेतवन’ बंगल्यात आवर्जून आले होते.
मोहिते-पाटील हे हाताला लागले नाहीत म्हणून बाळासाहेबांनी पंढरपूरचे वसंतराव काळे यांना शिवसेनेत खेचले आणि त्यांना पंढरपूरजवळ भाळवणी येथे चंद्रभागा सहकारी साखर कारखाना उभारण्यासाठी भरीव योगदान दिले. या रूपाने राज्यात शिवसेनेने सहकार चळवळीतील साखर कारखानदारीत प्रथमच पदार्पण केले होते. मात्र नंतर वसंतराव काळे यांनी सेनेची साथ सोडली.
राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर सोलापूर जिल्ह्य़ातील दिलीप सोपल (बार्शी), बबनराव शिंदे (माढा) व दिगंबर बागल (करमाळा) या अपक्ष आमदारांनी युतीला पाठींबा दिला. त्यामोबदल्यात बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शब्दानुसार माढा, बार्शी व करमाळा या तिन्ही तालुक्यांमध्ये सिंचनाची कामे झाली. विशेषत: माढा तालुक्यात तब्बल १९ किलोमीटर लांबीचा भीमा-सीना जोडकालवा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला.
सहकार चळवळीत पाय रोवण्याचा बाळासाहेबांचा पंढरीत पहिला प्रयोग
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सोलापूरचे खासदार तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते होते. त्याचे प्रत्यंतर अनोकवेळा पाहावयास मिळाले.
First published on: 18-11-2012 at 01:47 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First experiment to stand in co operative movement in pandharpur