तालुक्यातील खरीब व रब्बी हंगामात १०० टक्के गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आल्याने केंद्र व राज्य सरकारकडून फळबागा टिकविण्यासाठी हेक्टरी रुपये ३० हजार जाहीर केलेल्या अनुदानापैकी १५ हजार रूपयांप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी रक्कम २ कोटी ५५ लाख रूपये लवकरच मिळणार आहेत. येत्या एक-दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग होईल अशी माहिती आमदार अशोक काळे यांनी दिली.
तालुक्यातील गोदावरी कालव्यांना सिंचनाची आवर्तने शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे होऊ न शकल्याने हक्काचे ब्लॉकचे क्षेत्र असलेल्या व दहा-पंधरा वर्षांपासून जगविलेल्या डाळींब, चिक्कू, आंबा, द्राक्ष, पेरू, मोसंबी आदी १ हजार ७०० हेक्टरवरील फळबागा संकटात सापडल्या आहेत. शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीत शासनाने केलेली मदत काहीशी आधार देणारी असली तरी नुकसानीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. या पॅकेज अंतर्गत चार घटकांचा समावेश केला. त्यात बागांची छाटणी व देखरेख यावर खर्च हेक्टरी ३० हजार, प्लास्टीक मल्चींगकरीता एकुण खर्च हेक्टरी २० हजार, आयएनएम/आयपीएमसाठी हेक्टरी २ हजार, पाणी वाचविण्यासाठी वापरण्यात आलेल्या रसायनावर हेक्टरी ८ हजार असा एकूण रुपये ६० हजार खर्च गृहीत धरून त्याच्या ५० टक्के रक्कम दोन टप्प्यात देणे गरजेचे होते. हेक्टरी रुपये ३० हजार मदत अत्यंत कमी असून किमान ६० हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळणे आवश्यक होते, असे काळे यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळाला सामोरे जाताना जनतेने राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यातून टंचाईवर मात करण्याचे आवाहनही काळे यांनी तालुक्यातील केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा