कृष्णा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाच्या उसास पहिला हप्ता २ हजार ५०० रुपये देण्याचे घोषित केले आहे. संचालक मंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ‘कृष्णा’चे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी प्रसिद्धिपत्रकाने दिली.
पत्रकात म्हटले आहे, की कृष्णा सहकारी साखर कारखान्यात संस्थापक पॅनेलची सत्ता आहे. दिलेला प्रत्येक शब्द संस्थापक पॅनेल पाळत आलेला आहे. संस्थापक पॅनेलला तिन्ही शेतकरी संघटनांचे सहकार्य लाभत आले आहे. कारखान्याचे, शेतकऱ्यांचे, ऊसतोडणी कामगारांचे नुकसान होऊ नये म्हणून गेल्या तीन दिवसांपासून कारखान्याची ऊसतोडणी बंद ठेवण्यात आली होती. ती ऊसतोडणी सुरू करण्यात येणार आहे. कारखान्याने गेल्या वर्षी गळीत केलेल्या उसाला आत्तापर्यंत २३५० रुपये ऊसदर दिला आहे. तथापि अजूनही अंतिम बिल देणे बाकी आहे. पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. शेतकरी संघटनांनी कारखान्याला सहकार्य करावे अशी अपेक्षा अविनाश मोहिते यांनी केली आहे.

Story img Loader