संगणकावर किंवा मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येकाला हवी ती माहिती मिळत असली तरी कुठला सण केव्हा आहे, कोणत्या दिवशी तिथी कोणती आहे.. थोर पुरुषांची आणि संत महात्म्यांची पुण्यतिथी, जयंती.. प्रत्येकमहिन्यातील राशीभविष्य व दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टीची माहिती मिळविण्यासाठी आज घरोघरी कॅलडेरशिवाय पर्याय नाही. नवीन वर्षांला प्रारंभ होताच घरोघरी, सरकारी, निमसरकारी कार्यालयातील भिंतीवर कॅलेंडर टांगणे अनिवार्य आहे..
बाजारात आगळेवेगळे स्वरूप देऊन विविध प्रकाशकांची कॅलेंडर्स बाजारात विक्रीसाठी आली आहेत. नववर्षांचे भविष्य, पंचांग जाणण्याची सर्वसामान्याला उस्तुकता असते त्यामुळे कॅलेंडर घरात असणे काळाची गरज बनले आहे. कॅलेंडरचा इतिहास जुना असला तरी काळाच्या प्रवाहाबरोबर कॅलेंडरने आपले स्वरूप बदलले आहे. काही वर्षांपूर्वी मिळणारी कॅलेंडर धार्मिक देवदेवता, क्रीडापटू, निसर्ग आदींची फोटो याला पसंती होती. तारीख पाहण्यासाठी बारा महिन्यांचे बारा कॉलम होते. त्यामुळे भविष्य, पंचांग व इतर महत्त्वपूर्ण माहिती मिळत नसे. गेल्या १० वर्षांत फोटो असलेली कॅलेंडर्स कालबाह्य़ झाली असून सहा ते १२ पानी भरगच्च माहिती असलेली कॅलेंडर ग्राहक ३० ते १०० रुपये देऊन खरेदी करू लागला आहे.
कालनिर्णय, निर्णयसागर, महालक्ष्मी, हिंदू चेतना, सनातन सभा, यासह विविध संस्थाची कॅलेंडर विविध प्रकाशकांनी बाजारात आणली आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांची गरजपूर्ती ओळखून ही कॅलेंडर तयार करण्यात आली आहेत. पूर्वी कालनिर्णयाचा बोलबाला असताना आज विविध हिंदू संघटनांनी कॅलेंडर प्रकाशित केली असून त्यात विविध संतांची, देवदेवतांची आणि थोर पुरुषांची चित्र आहेत. या शिवाय पंचांग, लग्न, मौंज मुहूर्त, लहान मुलांनी स्वच्छतेबाबत घ्यायवयाची काळजी, आरोग्य विषयक आणि , वेगवेगळी खाद्य पदार्थ तयार करण्यासंदर्भातील माहिती, महापुरुषांचे छायाचित्र आदी विषयांवरील माहिती कॅलेंडरमध्ये आहे. काही खाजगी प्रकाशकांनी एका विशिष्ट विषयावर कलेंडर तयार केली आहेत. या शिवाय चित्रपट अभिनेते, पर्यटन स्थळे, लहान मुलांचे छायाचित्र असलेली कॅलेडर बाजारात विक्रीसाठी आली आहेत. विविध कंपन्याचे टेबल कॅलेंडर्सही मोठय़ा प्रमाणात बाजारात विक्रीला आले आहेत.  गेल्या काही वर्षांत विविध दैनिके आणि साप्ताहिके आता कॅलेंडरची निर्मिती करून वाचकांना देण्याचा प्रयत्न करू लागली आहे. वर्षांच्या शेवटी अंकासोबत कॅलेंडर दिले जात असून त्यात नागरिकांना हवी असलेली माहिती, रेल्वे, एसटीचे वेळापत्रक, शहरातील महत्त्वाचे संस्थाचे दूरध्वनी व संबंधित विभागाची माहिती दिली जाते. भविष्य, पंचांग, रेल्वे-बस टाईमटेबल, तेजी-मंदी, विविध सण-उत्सव, नामवंत लेखकांचे लेख, किचनचा मेनू, योगासने विवाह मुहूर्त हे सर्व एका कॅलेंडरमध्ये असल्याने ग्राहक ही कॅलेंडर खरेदी करू लागला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या कॅलेंडरमध्ये एक ते दोन रुपयांनी किंमतवाढ होते. गेल्या काही वर्षांत काही संघटनेच्या कॅलेंडरचा खपही वाढू लागल्याने तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे त्यामुळे प्रत्येकजण वेगळे काही तरी देण्याचा प्रयत्न करीत आहे. वेळ पाहण्यासाठी घडय़ाळाचा वापर होतो त्याप्रमाणे घरा-घरात कॅलेंडरचा वापर होऊ लागला आहे त्यामुळे या व्यवसायात दरवर्षी कोटय़वधीची आर्थिक उलाढाल होत असल्याचे कॅलेंडर विक्रेत्यांनी सांगितले.       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा