नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात प्रामुख्याने समावेश असलेल्या १८ गावातील ४५ प्रकल्पग्रस्तांना शुक्रवारी १५ ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत भूखंड वितरित केले जाणार असून ही देशातील पहिली भूखंड योजना आहे. सिडकोने या कार्यक्रमासाठी सर्व तयारी सुरू केली असून विमानतळ संघर्ष समितीने या सोडतीला विरोध केला आहे.
नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला एकूण दोन हजार ६७ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील १५०० हेक्टर जमीन सिडकोने नवी मुंबई शहर प्रकल्पासाठी संपादीत केलेली आहे. त्यामुळे ती सिडकोच्या ताब्यात आहे. काही जमिन खासगी, वन, व सरकारची आहे. त्याबाबत काहीही समस्या नाही, मात्र या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या टर्मिनल भागात विस्थापित होणाऱ्या १० गावांतील सहा गावांनी सिडकोने नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या पॅकेजला विरोध केला आहे. त्यामुळे सिडकोसमोर तिढा वाढला असून सिडको या विरोध करणाऱ्या ग्रामस्थांचे समाधान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रकल्पग्रस्तांमध्ये विश्वासार्हता वाढावी यासाठी सिडकोने २६ कलमी कार्यक्रम हाती घेतला असून पॅकेजमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत भूखंड देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा दिवस निवडण्यात आला असून या दिवशी सिडको मुख्यालयात ४५ प्रकल्पग्रस्तांना साडेबावीस टक्क्याचे भूखंड दिले जाणार आहेत. सिडकोने यासाठी पनवेल येथे स्वतंत्र मेट्रो सेंटर उघडले आहे. या प्रकल्पग्रस्तांमध्ये १००मीटरपासून ४ हजार मीटपर्यंत भूखंड असलेल्या प्रकल्पग्रस्तांचा सहभाग असून हे भूखंड सिडको नव्याने तयार करीत असलेल्या पुष्पकनगर विभागात दिले जाणार आहेत. देशात साडेबावीस टक्के विकसित भूखंड देणारी सिडको ही पहिली शासकीय कंपनी असून या स्थलांतराला तसेच जमीन देण्यास तयार झालेल्या प्रकल्पग्रस्तांना सिडको पॅकेजमधील इतर सुविधादेखील येत्या काळात देणार आहेत.
पत्रकार भवनासाठी ३० लाख रुपये मंजूर
नवी मुंबईतील अनेक पत्रकार संघटनांच्या प्रयत्नामुळे सिडको नेरुळ येथे पत्रकार भवन बांधून देण्यास तयार झाली असून नेरुळ सेक्टर ४२ मधील एक हजार चौरस मीटर भूखंडावरील या पहिल्या पत्रकार भवनासाठी नुकत्याच झालेल्या संचालक मंडळात ३० लाख रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या पत्रकारांची नवी मुंबईत राहण्याची व्यवस्था होणार आहे. हे भवन सिडको स्वत: चालविणार आहे.