हॅरी पॉटरच्या कादंबऱ्या आणि चित्रपटांनी अवघ्या जगभरात धुमाकूळ घातला आणि जादू या संकल्पनेकडे आबालवृद्ध आकर्षित झाले. अशावेळी जादू हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून जादूच्या सहाय्याने मुलांमधील आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती मोठय़ा प्रमाणात वाढू शकते तसेच या कलेचाही व्यापक प्रसार व्हावा या हेतूने प्रसिद्ध जादुगार भूपेश दवे यांनी दादर येथे महाराष्ट्रातील पहिली मॅजिक अकादमी उभारली आहे. या अकादमीचे उद्घाटन उद्या, शनिवार १० नोव्हेंबर रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
गेली २५ वर्षे जादूच्या दुनियेत वावरणारे भूपेश दवे यांनी इंग्लंड, अमेरिका, दुबई, बँकॉक तसेच आफ्रिकी देशात जादूचे अनेक प्रयोग केले आहेत. जादू या कलेचा प्रसार करतानाच त्याचा उपयोग मुलांमधील स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढविण्यासाठी करता येऊ शकतो हे त्यांनी अनेक कार्यशाळांमधून सप्रमाण सिद्धही के ले आहे. ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ येत असून उद्याच्या जगात तुमच्या मुलांची स्पर्धा ही शेजारच्या मुलाशी नसून बिल गेटस्च्या मुलाशी असणार आहे. अशावेळी स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी जादूचा प्रभावी वापर हेऊ शकतो हे लक्षात घेऊन दवे यांनी मॅजिक अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
रानडे रोडवरील कोहिनूर अपार्टमेंट येथील ‘मॅजिक अकादमी’चे उद्घाटन शनिवारी सायंकाळी ५ वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असून मनसेचे आमदार नितीन सरदेसाई हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. जादूला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी तसेच प्रचार व प्रचार व्हावा हा प्रमुख हेतू या अकादमीच्या स्थापनेमागे असून मुंबई व ठाणे परिसरातील शाळा-महाविद्यालयांमध्यें जाऊन प्रसार करण्यासाठी मॅजिक व्हॅनही दवे यांनी तयार केली आहे. यापूर्वीही जादुगार रघुवीर व जादूगार इंद्रजित यांच्यासह अनेक ज्येष्ठ जादूगारांनी जादूचा प्रसार करण्याचे काम केले आहे. मात्र ‘मॅजिक अकादमी’ ही संकल्पना प्रथमच राज्यात अस्तित्वात येत आहे. भूपेश दवे हे यापूर्वी अखिल भारतीय जादुगार संघटनेचे सरचिणीस म्हणूनही कार्यरत असून चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांच्या जादूचे चाहते आहेत.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा