दत्त संप्रदायातील बालगोिवदानंद सरस्वती (बालस्वामी) महाराज यांच्या प्रथम महासमाराधना महोत्सवानिमित्त औसा रस्त्यावरील दत्त मंदिरात उद्यापासून (रविवार) प्रवचन, व्याख्यान, गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २६ पर्यंत ७ दिवस दररोज काकड आरती, रुद्राभिषेक, पूजा, वेदपाठ, श्रीगुरुचरित्र पारायण, महिला मंडळांचे भजन, प्रवचन, हरिपाठ, प्रदोषारती, प्रार्थना असे पहाटे पाचपासून रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम होणार आहेत. उद्या दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रात्री ८ वाजता विवेकानंद रुग्णालयाचे डॉ. अशोकराव कुकडे यांचे प्रवचन होईल. रात्री ९ वाजता पंडित प्रभाकर कारेकर यांचे गायन होणार आहे. सोमवारी रात्री ८ वाजता पंडित नयन घोष (मुंबइ) यांचे सोलो तबलावादन, पंडित संदीप मिश्रा (बनारस) यांची सारंगी वादनाची जुगलबंदी होणार आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता रामायणाचार्य हलगरकर यांचे प्रवचन, रात्री ८ वाजता उस्ताद उस्मानखान (पुणे) यांचे सतारवादन व डॉ. विकास कशाळकर यांचे गायन, बुधवारी नागपूरचे भाऊ काणे यांचे प्रवचन, तर रात्री शौनक अभिषेकी यांच्या गाण्याची मफल, गुरुवारी आळंदचे डॉ. भीमाशंकर देशपांडे यांचे प्रवचन व रात्री मंगेश बोरगावकर यांची संगीत मफल रंगणार आहे. शुक्रवारी डॉ. अनिकेत इनामदार (उमरगा) यांचे प्रवचन व रात्री हन्नुमियाँ शेख (भालकी) यांचे गायन, शनिवारी श्रीपाद माळेगावकर यांचे प्रवचन व रात्री हरिष खंडेराव कुलकर्णी यांच्या गायनाने सांगता होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.