नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये तीन वर्षांपूर्वी झालेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी दिलेल्या बंदोबस्ताचे पाटील अॅकॅडमीने साडेपाच कोटी रुपये त्या वेळी न भरल्याने आता पोलिसांनी ‘अगोदर शुल्क भरा आणि नंतरच बंदोबस्ताचे बोला’ असा पावित्रा घेतला आहे. त्यामुळे छोटय़ा-मोठय़ा कारणांसाठी बंदोबस्त मागणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. नवी मुंबईत सध्या बारा महत्त्वाच्या व्यक्तींना पोलीस बंदोबस्त असून यात पाच जणांना महिन्याच्या सुरुवातीला धनादेश किंवा डी.डी.द्वारे बंदोबस्त शुल्क भरावे लागत आहे.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये तीन वर्षांपूर्वी आयपीएलचे सामने झाले होते. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त दिला होता. शेकडो पोलीस आणि उच्च अधिकाऱ्यांच्या या बंदोबस्तापोटी पाटील अॅकॅडमीला साडेपाच कोटी रुपये भरण्याची नंतर पोलिसांनी नोटीस बजावली होती, पण अॅकॅडमी हे पैसे भरण्यास टाळाटाळ करीत होती. अखेर भाजपचे सरचिटणीस संतोष पाचलग यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या शुल्कचोरीची गंभीर दखल घेऊन हा जनतेचा पैसा असून तो अॅकॅडमीला भरणे क्रमप्राप्त आहे असे बजावले. त्यामुळे अॅकॅडमीने आतापर्यंत तीन कोटी ७५ लाख रुपये भरले आहेत. शिल्लक दीड कोटी रुपये माफ व्हावेत यासाठी त्यांचे शासनाकडे प्रयत्न सुरू आहेत. सशुल्क बंदोबस्त घेऊन नंतर पैशासाठी टाळाटाळ करणाऱ्या व्यक्तींसाठी पोलिसांनी आता ‘अगोदर शुल्क भरा, नंतरच बंदोबस्ताचे काय ते बोला’ असा पावित्रा घेतला आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची पंचाईत झालेली आहे. अगोदर पैसे भरण्याच्या नियमामुळे ऊठसूट बंदोबस्त मागणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
पोलीस बंदोबस्तात..
नवी मुंबईत मंत्री शशिकांत शिंदे, फेब्रुवारीत खून झालेले सुनील कुमार लोहरिया यांचा मुलगा संदीप लोहरिया, त्यांचा भाऊ अनिलकुमार लोहरिया, दुसरा भाऊ अक्षितकुमार लोहरिया, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले, त्यांचा मुलगा ममित चौगुले, आमदार नरेंद्र पाटील, बिल्डर भूपेंद्र शाह, सुरेश हावरे, माथाडी नेते बाबुराव रामिष्ठे, आमदार मंगेश सांगळे, उद्योजक सुधीर तटकरे यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. यात चौगुले, शाह, हावरे आणि तटकरे यांना सशुल्क बंदोबस्त आहे. मंत्री गणेश नाईक यांना उच्च दर्जाची सुरक्षा असून ती शासनाकडून देण्यात आलेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा