यंदापासून मराठी चित्रपटांसाठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रभात पुरस्कारां’ची नामांकने जाहीर झाली असून पहिल्याच पुरस्कारांमध्ये ‘भारतीय’ चित्रपटाने सर्वाधिक १४ नामांकने मिळविली आहेत. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरलेलला ‘धग’, ‘इन्व्हेस्टमेंट’सह ‘काकस्पर्श’, ‘संहिता’, ‘तुकाराम’ आदी चित्रपटांनाही नामांकने मिळाली आहेत. ‘प्रभात’च्या वर्धापनदिनी १ जून रोजी पुणे येथील गणेश कलाक्रीडा केंद्र येथे पुरस्कार सोहळा होणार आहे.
भारतीय चित्रपटांमध्ये प्रभात फिल्म कंपनीचे नाव अजरामर झाले आहे. ‘प्रभात’चे नाव मराठी चित्रपटाशी कायम निगडित राहावे म्हणून सिनेमाशताब्दीच्या निमित्ताने विष्णूपंत दामले यांचे वारसदार आणि पुण्याच्या ‘प्रभात’ सिनेमाचे सर्वेसर्वा विवेक दामले यांनी मराठी चित्रपटांसाठी ‘प्रभात पुरस्कार’ देण्याची घोषणा केली होती.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१२ या कालावधीत सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांचा प्रभात पुरस्कारांसाठी विचार करण्यात आला आहे. सवरेत्कृष्ट चित्रपटांसाठी ‘भारतीय’, ‘धग’, ‘काकस्पर्श’, ‘संहिता’, ‘तुकाराम’ अशा पाच चित्रपटांमध्ये चुरस असून सवरेत्कृष्ट दिग्दर्शनासाठी शिवाजी लोटन-पाटील (धग), महेश मांजरेकर (काकस्पर्श) सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर (संहिता) यांना नामांकन मिळाले आहे. अन्य पुरस्कारांमध्ये विक्रम गोखले, सचिन खेडेकर, जीतेंद्र जोशी, उषा जाधव, प्रिया बापट, देविका दप्तरदार, पद्मनाभ बिंड, चिन्मय उद्गीरकर, हेमांगी कवी, सुप्रिया विनोद, श्वेता पगार, श्वेता साळवे, मकरंद अनासपुरे, ऋषिकेश जोशी, संदीप पाठक, वैभव मांगले आदी कलावंतांना वेगवेगळ्या विभागांत नामांकने मिळाली आहेत.
एकूण ३३ चित्रपटांनी या पुरस्कारांच्या २७ विभागांसाठी प्रवेशिका पाठविल्या होत्या. प्राथमिक फेरीतून १२ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी शिफारस करण्यात आली आहे. पहिल्या प्रभात पुरस्कारांचे वैशिष्टय़ म्हणजे चित्रपटांच्या अंतिम निवडीसाठी प्रेक्षक प्रतिनिधींनाही सहभागी करून घेण्यात आले. नामांकनांशी संबंधित सात चित्रपट त्यांना दाखविण्यात आले आणि त्यांचा कौलही घेण्यात आला, अशी माहिती विवेक दामले यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First prabhat aword nominies are