नागपूरला १९९१ साली झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेत झालेली बंडखोरी हा बाळासाहेबांच्या एकसंघ संघटनेवर झालेला पहिला जबरदस्त आघात होता आणि छगन भुजबळांसारख्या एकेकाळच्या विश्वासू शिवसैनिकाने पाठीत खंजीर खुपसल्याची सल बाळासाहेबांच्या मनात अनेक वर्षे कायम राहिली. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाच्या काळात शिवसेनेचा मुंबईत झपाटय़ाने विस्तार झाला. मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेला पाठिंबा तत्कालीन वसंतराव नाईकांचा असल्याच्या बातम्या त्या काळात प्रकाशित झाल्या. कालौघात वसंतराव नाईक यांचे पुतणे सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी छगन भुजबळ यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकासह शिवसेनेचे १७ आमदार फोडून काकांवर उलट कडी केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पोलादी विळख्यात असलेल्या शिवसेनेसाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. १९९१चे नागपुरातील हिवाळी अधिवेशनच शिवसेनेतील पहिली फूट आणि छगन भुजबळांच्या विधान परिषदेतील बाळासाहेबांविरुद्धच्या विखारी भाषणांनी गाजले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेतील बंडखोरीची कुणकुण राजकीय वर्तुळाला लागली होती. अत्यंत नियोजनबद्धरित्या शरद पवारांच्या नेतृत्त्वात सुधाकरराव नाईकांनी पावले टाकली आणि नागपुरात या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेतून फुटून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांची पळवापळवी, त्यांच्या मागावर असलेले शिवसैनिक, बंडखोर आमदारांचे अज्ञात ठिकाणी वास्तव्य, भुजबळांच्या गद्दारीने बिथरलेल्या शिवसैनिकांच्या संतापाचा स्फोट यातून घडलेले रामायण नागपूरचा राजकीय इतिहास झाला आहे.
पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाटय़ात न सापडता शिवसेनेच्या ५२ पैकी एक तृतीयांश आमदारांना फोडण्यात सुधाकरराव नाईकांना यश आले.
काँग्रेसच्या या जबरदस्त खेळीला तत्कालीन विधानसभाध्यक्षांची साथ मिळाली आणि अभेद्य शिवसेनेवर फुटीचा घाव घातला गेला. छगन भुजबळ त्यावेळी शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी यांच्यानंतरचे तिसऱ्या क्रमांकाचे बडे नेते होते. माळी समुदायाचे नेतृत्त्व करणारा हा ओबीसी नेता नंतर बाळासाहेबांच्या मनातून पार उतरला. याच भुजबळांमुळे ग्रामीण महाराष्ट्रात शिवसेनेची पाळेमुळे रुजली आहेत. भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडल्याने शिवसेनेच्या भविष्यातील विस्ताराबद्दल साशंकता निर्माण झाली. शिवसैनिकांच्याही मनात असलेल्या भुजबळांबद्दलच्या रागाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत राहिले. भुजबळांवर कित्येक महिने प्रचंड पोलीस संरक्षणात फिरण्याची वेळ आली. नागपूर अधिवेशनातील ही फूट महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक अविस्मरणीय घटना ठरली आहे.
छगन भुजबळांचे त्या काळात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्याशी असलेले मतभेद विकोपास गेले होते. १९९० च्या विधानसभा निवडणुकीनंतर मनोहर जोशींना विरोधी पक्षनेतेपदी बसविल्याने त्यांच्या नाराजीचा स्फोट पक्षाबाहेर पडण्यात झाला. मंडल आयोगाला शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या तीव्र विरोधामुळेही भुजबळ आणि बाळासाहेब यांच्यातील दरी वाढत चालली होती. हेदेखील भुजबळांच्या नाराजीचे प्रमुख कारण होते. भुजबळांनी शिवसेना फोडल्यानंतर काँग्रेसने लगेचच त्यांना राज्याचे महसूलमंत्रीपद देऊन मोठी बक्षिसी दिली. भुजबळांच्या बंडखोरीने सावध झालेल्या शिवसेनाप्रमुखांनी नंतर ठाकरे कुटुंबीयातील सदस्यांना संघटेनेची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. नागपूर अधिवेशनातील फुटीने एवढी उलथापालथ शिवसेनेत घडवून आणली.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा