टेस्ट टय़ूब बेबीचा प्रयोग दोन वेळा अयशस्वी ठरला. परंतु उमेद खचू न दिलेल्या ‘त्या’ जोडप्याच्या जीवनात विवाहानंतर १४ वर्षांत पारखा झालेला संततीप्राप्तीचा आशेचा किरण अखेर दिसू लागला. ‘लेसर असिस्टेड हॅचिंग’ हे आधुनिक तंत्रज्ञान प्रथमच वापरून मराठवाडय़ातली पहिलीच यशस्वी गर्भधारणा शहरातील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली.
मानवत (जिल्हा परभणी) येथील शिक्षक बळीराम मंगाराम वाघमारे व त्यांची पत्नी सिंधू यांना विवाहास १४ वर्षे होऊनही संततीसुख लाभू शकले नव्हते. टेस्ट टय़ूब बेबीद्वारे ते प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न दोन वेळा अयशस्वी ठरला. या दाम्पत्याच्या जीवनात या नवीन तंत्रामुळे आशेचा किरण चमकला आहे. हे नवीन तंत्रज्ञान वापरून झालेली मराठवाडय़ातली ही पहिलीच यशस्वी गर्भधारणा आहे. एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ‘जनरेशन नेक्स्ट टेस्ट टय़ूब बेबी सेंटर’मध्ये हा प्रयोग करण्यात आला. सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बोरधने यांनी ही माहिती दिली. सिंधू वाघमारे (वय ३७) ही महिला एमजीएम रुग्णालयात तपासणीस आली. तपासणीनंतर निदानानुसार लेसर असिस्टेड हॅचिंग तंत्राच्या साह्य़ाने यशस्वी गर्भधारणा झाली. सेंटरच्या प्रमुख एंब्रियोलॉजिस्ट डॉ. शिल्पा बोरधने यांचे या कामी सहकार्य मिळाले.
लेसर असिस्टेड हॅचिंग तंत्रज्ञानाची सुविधा देशातील मोजक्याच वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील अशी सुविधा उपलब्ध असणारे एमजीएमचे वैद्यकीय महाविद्यालय केवळ दुसरे केंद्र असल्याचे एमजीएम मेडिकल सेंटर अँड रिसर्च इन्स्टिटय़ूटचे ‘सीईओ’ डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी सांगितले. लवकरच येथे ‘प्री-इम्प्लान्टेशन जेनेटिक डायग्नोसिस’ (पीजीडी) व अनुवंशिक विकाराच्या प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरणारी ‘फ्लुअरेसेन्स इन सिटू हायब्रिडायझेशन’ (फिश) ही सुविधाही कार्यान्वित होणार आहे.     

सव्वालाख रुपये खर्च
गेल्या मे महिन्यात एमजीएममध्ये ही सुविधा उपलब्ध झाली. अनेक जोडप्यांचा टेस्ट टय़ूब बेबीचा प्रयोग दोन वा त्यापेक्षा जास्त वेळा अयशस्वी ठरला आहे. अशा जोडप्यांसाठी हे तंत्रज्ञान आशेचा किरण ठरू शकते. या साठी येणारा खर्च एक ते सव्वालाख रुपये आहे. मराठवाडय़ात प्रथमच हे तंत्रज्ञान उपलब्ध झाले असून याचा वापर करून केलेली ही पहिलीच यशस्वी गर्भधारणा आहे.

Story img Loader