सध्या मध्यवर्गीयांना विचार करणेच आवडत नाही, विचारांची तेजस्वी परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे दळभद्री चित्र आहे. प्रत्येकवेळी समाजाला देखाव्यापलीकडचे वास्तव सांगणारा विचारवंत लागतो. सम्यकनिष्ठा असलेल्या विचारांचा स्रोतच आपण घालून बसल्याने आता खरी कुरुंदकरांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले.
येथील कुसुम सभागृहात नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान व देशमुख आणि कंपनी यांच्या संयुक्तपणे ‘निवडक कुरुंदकर’ या ग्रंथाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन कुबेर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर देशमुख आणि कंपनीचे रवींद्र गोडबोले, प्रा. भु. द. वाडीकर उपस्थित होते.
कुबेर पुढे म्हणाले की, सध्याचा काळ आणीबाणीपेक्षाही भयंकर आहे. आणीबाणीच्या काळात राजकीय शत्रू आणि खलनायक स्पष्ट होता. आता कोणी राजकीय शत्रू नसेल पण त्यापलीकडे आक्राळविक्राळ ताकद असलेला आíथक शत्रू आपल्या सर्वाचे नियंत्रण करीत आहे. आपल्या विचार यंत्रणेवरच आíथक शक्तींनी ताबा मिळवला आहे. अशा वेळी चांगल्या अर्थाने समाजाच्या बाजूला राहून नीरक्षीर विवेक आणि ताíककपणे विचार करणारा कुरुंदकरांसारखा विचारवंत लागतो. आजच्या समाजात कुरुंदकर पचले असते काय? कारण स्वतंत्रपणे विचार करण्याची निíभड व्यक्तीच आपण गमावून बसलो आहोत, याकडे कुबेर यांनी लक्ष वेधले. सध्या जशी सनातन्यांची दहशत आहे, तशीच पुरोगाम्यांचीही दहशत आहे. विचारांना विरोध करणाऱ्यांची दहशत मोडण्याची ताकद कुरुंदकरांमध्येच होती. दरारा असेल अशी विद्वता कायम आदरणीयच असते. विचारांना घाबरणारा महाराष्ट्र कधीच नव्हता. पण आज विचारांचा दिवा महाराष्ट्रात मिणमिणता असणे ही वाईट गोष्ट आहे, असेही कुबेर म्हणाले. यावेळी बोलताना गोडबोले यांनी महाभारताने सांगितले की, धर्म, काम हे पुरुषार्थ परस्परावलंबी असून सम्यक बुद्धीचा वापर करून अर्निबध स्वातंत्र्य आणि धर्माने घातलेली बंधने यात आता तडजोड करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. आपल्याकडे दुर्बल घटकांचे संरक्षण करणारी कोणतीच यंत्रणा नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नरहर कुरुंदकर-रा. ज. देशमुख-सुलोचना देशमुख यांच्यातील विलक्षण नात्याला त्यांनी आपल्या भाषणात स्पर्श केला. अध्यक्षीय समारोपात प्रा. भु. द.वाडीकर यांनी कुरुंदकरांच्या आठवणी व त्यांच्या व्यक्तिमत्त्वास उजाळा दिला.
या कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे, कुरुंदकरांच्या समीक्षेवर पीएच.डी. करणारे प्रा. यशपाल िभगे यांचा कुबेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संयोजकांच्या वतीने लक्ष्मण संगेवार, श्यामल पत्की व जीवन िपपळवाडकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाधार देशमुख यांनी केले.
‘निवडक नरहर कुरुंदकर’ साहित्याच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन
सध्या मध्यवर्गीयांना विचार करणेच आवडत नाही, विचारांची तेजस्वी परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे दळभद्री चित्र आहे. प्रत्येकवेळी समाजाला देखाव्यापलीकडचे वास्तव सांगणारा विचारवंत लागतो.
First published on: 07-10-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First volume publish of nivadak narhar kurundkar