विदर्भातील मच्छीमार संस्था, मच्छीमार संघ व मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मंडळींना मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी २७ ते २९ डिसेंबरदरम्यान सडक-अर्जुनी तालुक्याच्या सौंदड रेल्वे स्थानकाजवळील मैदानावर मत्स्य प्रदर्शन व तंत्रज्ञान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रफुल्ल पटेल राहणार आहेत. विदर्भात मोठय़ा प्रमाणात मासेमारी व्यवसाय केला जातो. विदर्भातील नागरिक मोठय़ा प्रमाणात पारंपरिकरित्या मासेमारीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. मासेमारीच्या व्यवसायावरच अनेकांचा उदरनिर्वाह चालतो, परंतु मासेमारी करणाऱ्यांना योग्य त्या प्रमाणात व्यवसायाशी संबंधित मार्गदर्शन मिळत नाही. मासेमारी व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत नसल्याने विदर्भातील मत्स्य व्यवसाय विकसित होऊ शकला नाही. त्यामुळे मासेमारीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्यांचा आर्थिक विकास होऊ शकला नाही.
विदर्भातील मासेमारी करणाऱ्या संस्था, मच्छीमार संघ, मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना मत्स्य व्यवसायाशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, त्यांचा विकास व्हावा, या हेतूने हे तीन दिवसीय मत्स्य प्रदर्शन व तंत्रज्ञान शिबीर होत आहे. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून राज्य सरकारमधील विविध विभागांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात मत्स्य व्यवसायाशी संबंधी मार्गदर्शन, प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या मत्स्य प्रदर्शन व तंत्रज्ञान शिबिराची तयारी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जोमात सुरू आहे.
मत्स्य व्यवसायात यशस्वी होण्यासाठी, आर्थिक विकास साधण्यासाठी तीन दिवसीय मत्स्य प्रदर्शन व तंत्रज्ञान शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा