पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावी झालेल्या दरडग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे खाडीकिनारी राहणारे कोळी बांधव धावून जाणार असून, यावर्षी नारळी पौर्णिमेचा सण धूमधडाक्यात साजरा न करता माळीण गावातील महादेव कोळी बांधवांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला जाणार आहे. राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त कोळी बांधवांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कोळी महासंघाने हा निर्णय जाहीर केला आहे.
राज्यातील ३६ जिल्ह्य़ांपैकी ठाणे, रायगड जिल्ह्य़ांत कोळी समाजाची संख्या जास्त आहे. त्यामुळे रविवारी संपन्न होणारा नारळी पौर्णिमेचा सण हा या कोळ्यांसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. दोन महिने बंद असणारी मासेमारी या सणानंतर आठ दिवसांनी पुन्हा सुरू होणार आहे. समुद्राला नारळ वाहिल्यानंतर ही मासेमारी सुरू केली जात असते. त्यामुळे कोळी बांधवांत मोठा उत्साह आणि आनंद पसरलेला असल्याचे दिसून येते. नारळी पौर्णिमेच्या सणाला अनेक खाडीकिनारी गावात मोठय़ा उत्सवाचे स्वरूप आले असल्याने यावर्षी हा सण थोडा आटोपता घेण्याचा सल्ला कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी दिला आहे. माळीण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अनेक रहिवाशांपैकी शंभरपेक्षा जास्त रहिवासी हे महादेव कोळी समाजाचे होते. त्यामुळे या समाजावर एक मोठी शोककळा पसरली आहे. राज्यातील सर्व कोळी बांधवांचे संघटन करणाऱ्या या संस्थेच्या अनेक कार्यकर्त्यांनी नुकतीच माळीण गावाला भेट दिली आहे. तेथील परस्थिती पाहून यावर्षी कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात न करता त्यावर होणार खर्च माळीण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या नातेवाईकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात महासंघाच्या वतीने करण्यात येणार असून, कोळी बांधवांकडून मिळणारी आर्थिक तसेच साहित्य रूपातील मदत या बांधवांच्या नातेवाईकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी महासंघाने घेतली आहे. तेव्हा ज्या कोळी बांधवांना आपल्या माळीण बांधवांसाठी मदत करावयाची आहे, त्यांनी महासंघाच्या कार्यालयात येऊन करावी अथवा ९३२४५६७३९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
खाडीकिनाऱ्याच्या कोळ्यांचा दुर्घटनाग्रस्त माळीणमधील कोळी बांधवांना मदतीचा हात
पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावी झालेल्या दरडग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे खाडीकिनारी राहणारे कोळी बांधव धावून जाणार असून, यावर्षी नारळी पौर्णिमेचा सण धूमधडाक्यात साजरा न करता माळीण गावातील महादेव कोळी बांधवांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला जाणार आहे.
First published on: 09-08-2014 at 12:36 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fisherman to help malin landslide victims