आठ जणांना लागण, १ अत्यवस्थ, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील तापाची साथ आटोक्यात येत नाही तोच मोताळा तालुक्यातील बोरखेड व तारापूर येथे अज्ञात तापाने थमान घातले आहे. गावातील अनेकांना या तापाची लागण झाली असून त्यापैकी आठ जण येथील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी एका युवतीची प्रकृती चिंताजनक आहे. गावात घाणीचे साम्राज्य व दूषित पाण्यामुळे ही साथ पसरल्याचा आरोप रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. गावात काही दिवसांपासून तापाची साथ पसरली असतानाही आरोग्य विभाग सुस्त आहे. परिणामी, रुग्णांना आर्थिक भरुदड सहन करून खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून डोंगर पायथ्याशी असलेल्या बोरखेड, बेराळा व तारापूर या गावात ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. गावाला दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे या गावातील अनेकांना अज्ञात तापाची लागण झाली आहे. प्रत्येक घरातील एक जण या तापाने ग्रासून गेला आहे. एका पाठोपाठ एक रुग्ण तापाने फणफणत असल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापैकी आठ रुग्ण येथील एकाच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यात बोरखेड येथील सोनल विठ्ठल कांडेलकर (१५), संजय कर्तारसिंग चव्हाण (२३), कमल उत्तम जाधव (३२), तर बेराळा येथील अजबकौर देविदास सुरडकर (४५) आणि तारापूर येथील इंधन मायचंद डांगे (३५), दिलीप मायचंद डांगे (३०), गौरव हरिचंद्र चव्हाण (१) व नरेंद्र जयसिंग जाधव (१७) यांचा समावेश आहे, तर अनेक रुग्ण दुसऱ्या खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेत आहेत.
या अज्ञात तापामुळे रुग्णांचे डोके दुखणे, मळमळ होणे, शरीरातील पेशी कमी होणे, अशक्तपणा येणे आदी लक्षणे दिसून येत आहेत. या रुग्णांपैकी सोनल कांडेलकर या युवतीची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथे अनेकांना तापाची लागण झाली होती. या साथीने चक्क चार जणांचा बळी घेतला होता. ही साथ आटोक्यात येत नाही तोच मोताळा तालुक्यातील बोरखेड व तारापूर या गावात तापाच्या साथीने थमान घातले आहे. गावात घाणीचे साम्राज्य व दूषित पाण्यामुळेच ही साथ पसरल्याचा आरोप रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, तारापूरचे सरपंच प्रवीण जाधव व पोलीस पाटील प्रकाश सपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता गावाची साफसफाई करून ग्रामस्थांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच तापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाला कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, एवढय़ा मोठय़ा संख्येने नागरिकांना तापाची लागण झाली असतानादेखील या गंभीर घटनेची आरोग्य विभागाला साधी खबरसुद्धा नाही. ही साथ रौद्ररूप धारण करण्याअगोदर गावात आरोग्य पथक दाखल करून रुग्णांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा