सीबीएससीचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या नारायण विद्यालयाच्या स्कूल बसेसमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता विद्यालयाच्या पाच स्कूल बसेस जप्त करून त्यांची परवानगी रद्द करण्यात येईल, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी विधान परिषदेत दिली. आमदार शोभा फडणवीस यांनी ही लक्षवेधी मांडली होती. १३ डिसेंबरला लक्ष्मीनगरातील माटे चौकात आल्यानंतर शाळेची बस सुरू झाली आणि ब्रेक खराब झाले. त्यामुळे चालत्या गाडीतून पाचवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या जिविताचा धोका पत्करून त्यांना उतरवण्यात आले. घाबरलेल्या व संतापलेल्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी आरडाओरड करून प्रतापनगर पोलीस ठाण्याला दूरध्वनी केले. तसेच पालकांनी शाळांमधील समितीकडेही बसची तक्रार केली. यासंबंधी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने मोटार वाहन अधिनियमातील अन्वये वाहन चालकाच्या गुन्ह्य़ाबद्दल तडजोड शुल्क स्वीकारले आणि त्या वाहनातील दोष सात दिवसांच्या आत दूर करण्यासाठी पुन्हा वाहन चालकाच्या ताब्यात ते देण्यात आले. वाहन मालकाचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या विरोधात कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. खटला दाखल करण्याऐवजी तडजोड शुल्क स्वीकारण्याचे कारणच काय असा प्रश्न शोभा फडणवीस यांनी विचारला. एकीकडे मोटार वाहन निरीक्षकाने निरीक्षण नोंदवून ब्रेक यंत्रणा बंद होणे, वाहनात वेग नियंत्रक नसणे, क्लच सिस्टिम कडक होणे आदींसारख्या शाळा व्यवस्थापनाच्या भयंकर चुकांसंदर्भात काहीही कारवाई न घेता तडजोड करणे अतिशय चुकीचे असून जिवावर उदार होऊन पालकांनी त्यांच्या पाल्यांना त्या बसेस मधून का पाठवायचे, अशी विचारणा सभागृहात केली. एकूण ३५७ शाळांपैकी ७० शाळांमध्ये शाळांच्या समित्याच अस्तित्वात नसल्याचे पालक व विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणी सांगणे शक्य नसल्याचे शोभा फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर गुलाबराव देवकरांनी त्या पाचही स्कूल बसेसना जप्त करून त्यांची परवानगी रद्द करण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि तडजोड करून कारवाई न करणाऱ्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची चौकशी करून सर्वच स्कूल बसेसची चौकशी केली जाईल.
लक्षवेधी दरम्यान उपसभापती वसंत डावखरे यांनी हस्तक्षेप करून आरटीओ कार्यालयातील दलाल आरटीओची सही करतात. ठाण्याचा आरटीओ तर स्वत:ला शासनापेक्षाही मोठा समजतो. त्याच्यावर कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र, त्याच्यावर अद्यापपर्यंत गुन्हा का दाखल केला नाही, असे कडक शब्दात डावखरे यांनी विचारले. त्यावर कावरेबावरे होऊन गुलाबराव देवकरांनी नियमानुसार सभापतींनी सांगितल्याप्रमाणेकडक कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले.
नारायण विद्यालयाच्या पाच स्कूल बसेसची परवानगी रद्द होणार
सीबीएससीचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या नारायण विद्यालयाच्या स्कूल बसेसमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता विद्यालयाच्या पाच स्कूल बसेस जप्त करून त्यांची परवानगी रद्द करण्यात येईल, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी विधान परिषदेत दिली.
First published on: 21-12-2012 at 02:52 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five buses of narayan school licence will be cancelled